राष्ट्रवादी फुटीमागे सिंचन घोटाळा कारणीभूत? जयंत पाटील नेमकं काय म्हणले?

सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना भाजप गेल्या 10 वर्षांपासून ब्लॅकमेल करत असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केलाय. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 2, 2024, 08:56 PM IST
राष्ट्रवादी फुटीमागे सिंचन घोटाळा कारणीभूत? जयंत पाटील नेमकं काय म्हणले? title=

पुणे, निलेश खरमरेसह अरुण मेहेत्रे 'प्रतिनिधी' : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना राष्ट्रवादीच्या फुटीबाबत जयंत पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सिंचन घोटाळ्यावरुन अजित पवारांना भाजपनं ब्लॅकमेल केल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय. सिंचन घोटाळ्याचा वापर करुनच भाजपनं राष्ट्रवादी फोडल्याचं जयंत पाटलांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

विरोधी पक्षात असताना फडणवीसांचे अजित पवारांवर आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर आरोप केले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी आर आर पाटील यांच्यावर आरोप करणारी फाईल अजितदादांना दाखवली. याचाच अर्थ तेव्हापासूनच आमच्या पक्षाअंतर्गत वादाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू होते. दुसरे म्हणजे अजित पवारांना फाईल दाखवून दहा वर्ष ब्लॅकमेल केलं. 
अजितदादांना पुन्हा पुन्हा भाजपसोबत जावंसं का वाटत होतं हे यावरून स्पष्ट होतं. अजितदादांना ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. असं जयंत पाटील यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. 

जयंत पाटील यांचं वक्त्व्य निराधार

अजित पवार हे कुणालाही न घाबरणारे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांनी केलेलं वक्त्व्य निराधार आहे. उलट जयंत पाटील यांना महाविकास आघाडीत भवितव्य नसल्याचा आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे. 

अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळं काही गोष्टी तारखेनुसार सांगाव्या लागतील असा इशारा सुनील तटकरेंनी जयंत पाटलांना दिला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांच्या आरोपांना उत्तर दिलंय. जयंत पाटलांचे आरोप म्हणजे मस्करी असल्याचा टोला त्यांनी लगावलाय.

अजित पवार यांनी विशिष्ट हेतूनं सिंचन घोटाळ्यातील चौकशीच्या सहीबाबत आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जयंत पाटलांनी नवे आरोप केलेत. यावर आता भाजप कोणत्या आरोपांनी प्रत्युत्तर देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.