वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव : आई होण्याचं सुख प्रत्येक स्त्रीसाठी अनोखं असतं. आईपण अनुभवायला मिळणं हे या महिलेच्या नशीबात नव्हतं. बाळाचा जन्म झाला मात्र चेहरा बघता आला नाही. 30 वर्षांच्या विवाहितेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली.
जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनी येथील 30 वर्षाच्या विवाहितेचा प्रसूतीनंतर शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्त रक्तस्राव झाल्याने खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. मुलगा जन्माला आला मात्र त्याचा चेहरा पाहण्याआधी काही तासातच त्याच्या आईचा मृत्यू झाला. पूजा जयप्रकाश विश्वकर्मा असं मृत महिलेचं नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पूजा हिच्या पतीसह कुटुंबियांनी केला.
पूजा विश्वकर्मा या महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी जळगावातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले. प्रसूती झाली आणि या महिलेनं एक गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर संध्याकाळी पूजा हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने अपेक्स रुग्णालयातील येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
रक्तस्राव थांबत नसल्याने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती ५० टक्के चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र रात्री महिलेनं जगाचा निरोप घेतला. तिला शेवटचं बाळाला पाहताही आलं नाही.
याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूजाचा मृत्यू झाला असल्याने संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करावी तसेच पूजा मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली आहे. तर प्रसूतीनंतर गर्भपिशवी आकुंचन पावणे गरजचे असते. मात्र पूजा हिची गर्भपिशवी पाहिजे, त्या प्रमाणात आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला.