अपघात घडवून सख्या भावाचा खून केल्याचं उघड

नाशिकमध्ये अपघात करून हत्या करण्याच्या घटनेत वाढ

Updated: Jan 14, 2023, 08:17 PM IST
अपघात घडवून सख्या भावाचा खून केल्याचं उघड title=
अपघाताचा बनाव करून खून करण्यात आलेला मयत ज्ञानेश्वर कराड

सोनू भिडे, नाशिक:-  

अपघाताचा बनाव करून खून करण्याचे प्रकार सध्या नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या महिन्यात विम्याचे चार कोटी मिळविण्यासाठी मित्राचा आणि एका अनोळखी इसमाचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला होता. असाच एका प्रकार पुन्हा नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. अपघाताचा बनाव करून प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्याभावानेच भावाचा खून केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे.  

असा घडला प्रकार 

ज्ञानेश्वर कराड आणि दीपक कराड हे सख्खे भाऊ कुटुंबासह मखमलाबाद गावात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. ज्ञानेश्वर हे त्यांच्या सावत्र आई सोबत राहतात. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ज्ञानेश्वर घरी न आल्याने तिने दीपकला फोन केला. दिपकने भावाचा शोध घेतला असता ज्ञानेश्वरचा मखमलाबाद येथील कॅनॉलमध्ये पडून अपघात झाला असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर याबाबत पोलिसांना  कळविण्यात आले.घटना बघता नाशिक पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

एकूणच घरातील वैमनस्य बघता नातेवाईकांनी  हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला तशी रीतसर तक्रार करण्यात आली . घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी  सखोल चौकशी केली असता दिपकने खून केल्याच पोलीस तपासात उघड झाल आहे. 

या कारणासाठी करण्यात आला खून 

ज्ञानेश्वर आणि दीपकच्या वडिलांनी १०२ गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावावर खरेदी केली होती. या जमिनीतील काही भाग विकून दीपकला प्लॉट खरेदी करून दिला होता. १०२ गुंठे जमिनीमधील ५२ गुंठे जमीन सावत्र आईच्या नावावर करण्यात आली होती. आईच्या अडाणीपणाचा फायदा घेत दिपकने ५२ गुंठे जमीन आपल्या नावावर करून घेतली होती. याबाबत ज्ञानेश्वरने न्यायालयात दावा दाखल केला होता. सावत्र आईला मदत केल्याचा राग दीपकच्या मनात असल्याने त्याने ज्ञानेश्वरचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून खून कसा करण्यात आला याचा तपास आता पोलीस करत आहेत.

मात्र या घटनेने रस्त्यावर होणारे अपघातांना पोलिसांना सतत संशयाच्या नजरेतून बघावे लागणार आहे गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात आणि शहरात दोन्ही मिळून पंधराशेच्या वर लोकांचा बळी गेला आहे यातील अनेक अपघात याच पद्धतीने केले गेले असू शकतात त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व अपघातांचं विश्लेषण होणे गरजेचे आहे