Maharashtra News : इतिहासकार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंत यांना दूरध्वनीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून, प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इंद्रजीत सावंत यांना धमक्या दिल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीनं इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करत घरात येऊन मारण्याची देखील दिली धमकी दिली.
सोमवारी रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हे धमकीचे फोन आले असून, सावंत यांनी एक फेसबुक पोस्ट केली. जिथं त्यांनी संबंधित प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत अर्वाच्य शिवीगाळ गेल्याचं म्हटलं. सदर प्रकरणी दोन फोन आल्याची प्राथमिक माहिती असून, पहिला फोन आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. पण, दुसरा फोन आला तेव्हा मात्र सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. जिथं 'घरी येऊन बघून घेईन', अशा भाषेत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
ब्राह्मणद्वेष पसरवण्याप्रकरणीचा रोष फोन करणाऱ्या व्यक्तीनं धमकी देताना बोलून दाखवला. प्रशांत कोरटकर कोण आहेत याचा तपास घेण्याची मागणी आता इतिहासकारांकडून केली जात आहे.
इतिहासाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची मोडतोड न करता इंद्रजित सावंत हे पुस्तकाच्या आधारे इतिहास मांडत असतात. त्यांना त्यावरून एकेरी भाषेत प्रश्न विचारत यांना धमकी देण्यात आली. इतिहास संशोधकांना धमकीचे फोन ही धक्कादायक बाब असल्याचं आता स्पष्ट होत आहे.
दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार सावंत यांनी दाखल केली नसून, इतिहासकारांना असे फोन येतात ही बाब आपण समाजमाध्यमांवर मांडली आहे, ती मांडणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.