सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : Vegetable Price Hike : सणवार सुरू झालेले असतानाच भाजीपाल्याची आवकही वाढताना दिसत आहे. पण, सणवारांच्या याच दिवसावर महागाईचं सावट पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच भाज्यांचे दर कडाडल्याचं वृत्त आलेलं असताना आता कोथिंबीरीच्या दराचे आकडे समोर आले आणि अनेकांनाच धक्का बसला. मुंबई लोकलच्या मासिक पाससाठी जितके पैसे मोजावे वागत नाहीत, इतक्या किमतीला सध्या कोथिंबीरीची एक जुडी मोजावी लागत आहे.
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रात्री झालेल्या लिलावात चक्क कोथिंबिरीला प्रतिजुडी 450 रुपये भाव मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरीला एवढा भाव मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची सतत धार सुरू आहे. काल सकाळपासूनच नाशिक शहरा सह जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू होती आणि यामुळे अनेक पालेभाज्या खराब झाल्या तर काही भाजीपाला बाजार समितीत पोहोचलाच नाही.
नुकताच झालेला बैल पोळा हा सण असल्याने शेतकरी हा बाजार समिती मध्ये आलाच नाही म्हणून काल भाजी पाल्याची अवक कमी झालिये. यामुळे चक्क एक नंबर च्या कोथिंबिरीला शेकडा 45 हजार रुपये भाव मिळालाय. तर कमीत कमी 100 रुपये प्रति जोडी असा भाव मिळालाय. सगळ्याच भाज्यांना चव देणारी कोथिंबीर आता न परवडणारी झाल्याने गृहिणींचे घरातील बजेट कोलमडले आहे. मिळालेल्या भावमुळे शेतकरी आनंदी असल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.