महाराष्ट्रात गिया बार्रे सिंड्रोमचा धसका! 8 दिवसात रुग्णांची शंभरी पार!

Guillain Barre Syndrome:  1500 हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आल असून 8 दिवसात रुग्णांची शंभरी पार केली आहे.

Updated: Jan 28, 2025, 04:06 PM IST
महाराष्ट्रात गिया बार्रे सिंड्रोमचा धसका! 8 दिवसात रुग्णांची शंभरी पार! title=
गीया बार्रे सिंड्रोम

Guillain Barre Syndrome: राज्यात गीया बार्रे सिंड्रोमने शिरकाव केला असून यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुण्यात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या 111 वर पोहोचली आहे. यातील 17 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 1500 हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आल असून 8 दिवसात रुग्णांची शंभरी पार केली आहे. राज्यात गीया बार्रे सिंड्रोम चे रुग्ण वाढत असल्याने आता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आहे.

केंद्र सरकारडून तज्ज्ञांच्या 7 सदस्यीय पथक

25 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात गीयन बारे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराचे 73 रुग्ण सापडले होते. यातील 70 रुग्ण पुणे जिल्ह्यात होते, तर 3 रुग्ण इतर जिल्ह्यात होते. या रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.  गीया बार्रे सिंड्रोम मुळे  आजारी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या लक्षणीय वाढीच्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारने तज्ज्ञांचे सात सदस्यीय पथक नेमले आहे. महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण यात मदत करेल. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही ही समिती लक्ष ठेवेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पथक आज पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

आरोग्य विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी 

पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारा संदर्भात सार्वजनिक आरोग्य विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापनात राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथक महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील पुणे येथे गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या संशयास्पद आणि खात्री पटलेल्या  रुग्णांच्या संख्येतील  वाढ लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य उपाययोजना  आणि व्यवस्थापनात राज्य आरोग्य प्रशासनाला  मदत करण्यासाठी  एक उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथक नियुक्त केले आहे.

 राज्याबरोबर समन्वय साधून सक्रिय पावले उचलणार

महाराष्ट्रासाठीच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निम्हान्स बेंगळुरू, पुणे येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मधील  सात तज्ञांचा समावेश आहे. एनआयव्ही, पुणे येथील तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करत असून आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे.हे पथक  राज्याच्या आरोग्य विभागांबरोबर एकत्रितपणे  काम करेल , प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची शिफारस करेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि राज्याबरोबर समन्वय साधून सक्रिय पावले उचलत आहे.