लोणावळा आणि मावळमध्ये बंदला मोठा प्रतिसाद

 रेल्वे स्टेशन आणि एसटी आगारातही शुकशुकाट 

Updated: Aug 9, 2018, 12:50 PM IST
लोणावळा आणि मावळमध्ये बंदला मोठा प्रतिसाद title=

लोणावळा : सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा आणि मावळ परिसरात १००% प्रतिसाद मिळला असून या बंदच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यातील सर्व बाजारपेठा तसेच शाळा, महाविद्यालय, कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. लोणावळा रेल्वे स्थानकावर संभावित रेलरोकोच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन सह लोणावळा एसटी आगारातही सकाळपासून शुकशुकाट दिसत आहे.

या बंदचा परिणाम मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेसह जुना मुंबई पुणे हायवेवर देखील दिसून येत आहे. वाहनांनी नेहमीच गजबजलेल्या आणि सतत व्यस्त असलेल्या या मार्गावर शुकशुकाट दिसत असून अत्यल्प प्रमाणात वाहने दिसत आहेत.

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे एसटी आगाराने सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील बस स्थानकांवर शुकशुकाट पहायला मिळतोय. पोलिसांच्या सुचनेनुसार प्रवाशांची सुरक्षा आणि एसटीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी तसचं एसटीने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून काही शहरांनी माघार घेतली आहे. मुंबई, नवी मुंबईतील मराठा समन्वय समितीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरात केवळ काळ्या फिती लावून आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. मात्र एसटी महामंडळाने मुंबईतले तीनही एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.