स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी टेकाडे हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून कडा येथील सचिन आणि मंजुश्री टेकाडे या डॉक्टर दाम्पत्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.

Updated: Sep 4, 2017, 08:13 PM IST
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी टेकाडे हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम title=

लक्ष्मीकांत रुईकर, झी मिडीया, बीड : स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून कडा येथील सचिन आणि मंजुश्री टेकाडे या डॉक्टर दाम्पत्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.

बीड जिल्ह्यात मागील काही वर्षात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढल्याने मुलींचा जन्मदर घटला होता,एक हजार मुलांमागे ८४१ मुली हे प्रमाण होते,मुलींच्या जन्मदारात वाढ व्हावी यासाठी सामाजिक संस्था,प्रशासन यांच्या पातळीवर दोन तीन वर्षात प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कडा येथील टेकाडे हॉस्पिटलने अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

मुलगी ही ओझं नाही तर वंशाचा दिवा आहे,त्यामुळे तिच्या जन्माचे स्वागत करा म्हणून आम्ही नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मुलगी झाली तर मोफत डिलिव्हरी करणार आहोत तर सिझर झाल्यास पन्नास टक्के खर्च माफ करण्यात येणार आहे. टेकाडे हॉस्पिटलने या उपक्रमाचा शुभारंभ एका लहान मुलीच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केला,त्यापूर्वी शहरातून बेटी बचाव संदेश देणारी रॅली काढण्यात आली.