मोठी बातमी! उद्धव ठाकरे गिरगावमधील H N Reliance रुग्णालयात दाखल

Uddhav Thackeray In H. N. Reliance Hospital: आज सकाळी आठ वाजल्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिलायन्स एच. एन. रुग्णालयामध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2024, 03:03 PM IST
मोठी बातमी! उद्धव ठाकरे गिरगावमधील H N Reliance रुग्णालयात दाखल title=
सकाळी आठ वाजल्यापासून रुग्णालयात (फाइल फोटो - सौजन्य - एएनआय)

Uddhav Thackeray In H. N. Reliance Hospital: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी आठ वाजल्यापासून एच. एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. हृदयासंदर्भातील नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले आहेत. सकाळपासूनच उद्धव ठाकरे हृदयासंदर्भातील काही चाचण्यासाठी रुग्णालयात आल्याची माहिती समोर आली आहे.

कशासाठी गेले रुग्णालयात?

उद्धव ठाकरे चेकअपसाठी रुग्णालयात आले असून. हार्ट ब्लॉकेजच्या चेकअपसाठी माजी मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंना हृदयासंदर्भातील समस्या जाणवू लागल्याने त्यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज आहेत की नाही हे तपासण्यासाठी अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफीमधून हृदयात असणारे ब्लॉकेज शोधले जातात. अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज आढळून आल्यास पुढील उपचार केले जातात. त्यामुळेच उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये काही ब्लॉकेजेस सापडले असतील तर अँजिओप्लॅस्टी देखील होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. यापूर्वी 2012 साली उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी झाली होती. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ते आज चेकअपसाठी रुग्णालयात गेले आहेत.

मानेची शस्रक्रिया

2021 साली मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी उद्धव ठाकरे एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर 12 नोव्हेंबर 2021 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. तासभर उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आठवड्याभराने उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू करण्यात आली होती. याच शस्त्रक्रीयेदरम्यान उद्धव ठाकरेंनी अनेक बैठका तसेच काही वेळेस जनतेशी मानेला आजरपणामुळे आलेला पट्टा लावून संवाद साधला होता. उद्धव ठाकरेंचं हे आजरपण शिवसेनेतील बंडानंतरही राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय ठरलं होतं. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं.

आजच बोलावलेली बैठक

उद्धव ठाकरेंनी आजच मुंबईमधील मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीसंदर्भातील पुढील तपशील अद्याप हाती आलेला नाही. मात्र मुंबईमधील मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी, उमेदवारीसंदर्भात चर्चेसाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. याबैठकीमध्ये संभाव्य उमेदवारांबरोबरच मुंबईमधील निवडणुकीची रणनिती आणि इतर विषयांवर चर्चा होणं अपेक्षित होतं. दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरेंच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी प्रतिक्रिया नोंदवताना आधी महायुतीने उमेदवार जाहीर केल्यावर आम्ही उमेदवार जाहीर करु असं सांगितलं आहे.