अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी दीपाली चव्हाण यांनी डोक्यात गोळ्या झाडून त्यांचं जीवन संपवलं आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं दीपाली चव्हाण यांनी म्हटलं आहे. वनविभागात RFO असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी ४ पानांची चिठ्ठी लिहिली आहे. यात त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. DFO विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली आहे.
दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळ्या झाडण्यापूर्वी पतीला फोन कॉल केला होता, त्यात तुमच्यासाठी खिचडी करून ठेवते, तुम्हाला शेवटच बघायचं आहे, असं दीपाली यांनी म्हटलं होतं.
शिवकुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती, त्याला नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे
DFO विनोद शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केला आहे. दिपालीचे पती म्हणतात, दीपालीवर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील यापूर्वी दाखल करण्यात आला आहे. यावर तसेच वरिष्ठांनी दिलेल्या त्रासावर आमचं वारंवार बोलणं व्हायचं, वरिष्ठांकडेही याविषयी तक्रारी दिल्या आहेत, पण त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही.
अॅट्रॉसिटीविषयी बोलताना दीपालीचे पती राजेश मोहिते म्हणतात, या उलट विनोद शिवकुमार आणि दीपाली यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप आजही माझ्याकडे आहे. ज्यात विनोद शिवकुमार यांनी किती शिवगाळ दीपालीला केली आहे, हे ऐकता येईल. विनोद शिवकुमार याच्या जाचामुळेच दीपालीने आत्महत्या केली आहे, त्याला गंभीर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राजेश मोहिते यांनी केली आहे.
दीपाली यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अतिशय गंभीर गोष्टी लिहिल्या आहेत. डीएफओ विनोद शिवकुमार हे आपला गावकऱ्यांसमोर, इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमान करतात, सोबत अश्लील शिवीगाळ करतात, निलंबनाची धमकी देतात, कारण नसताना रात्री भेटायला बोलवतात.
शिवकुमार यांनी मला एकटं बोलवून माझ्या एकटेपणाचा अनेकवेळा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मर्जीने वागत नसल्याने ते त्रास देत होते. यामुळे माझं आर्थिक आणि मानसिक नुकसान कसं होईल यावर त्यांचा भर होता. माझं वेतन देखील त्यांनी रोखून धरलं आहे, माझं वेतन तात्काळ काढा आणि माझ्यानंतर माझ्या आईला द्या, अशी मागणी दीपालीने तिच्या आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिली आहे.
शिवकुमार हा माझ्या मुलीला खूप दिवसापासून अधिकाऱ्यांचा त्रास होता, माझ्या घरी शिवकुमार हे अधिकारी नेहमीच घराबाहेर चकरा मारत होता, दीपालीला शिवीगाळ करत होते, त्यामुळे त्यांना कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले, शिवकुमारला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी नाही दिली तर मला फाशी द्या, अशी मागणी मृत दिपाली चव्हाण यांचे आई शकुंतला चव्हाण यांनी केली आहे.
गर्भवती असताना मला ट्रॅकवर अनेकवेळा बोलावण्यात आलं, मालूरच्या कच्च्या रस्त्यांवरुन मुद्दाम फिरवण्यात आलं, माझा यामुळेच गर्भपात झाला. मला तरी देखील ड्युटी करण्यास भाग पाडलं. अॅट्रॉसिटीच्या धमक्या तर मिळायच्या सोबत ४ महिने जेलमध्ये गेल्यावर कसं वाटेल? ही देखील एक धमकी होती, हे सर्व दीपाली यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि अप्पर मुख्य प्रधान वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना ही सूसाईड नोट लिहिण्यात आली आहे. रेड्डी यावर म्हणतात, "दीपाली पतीसह बदली संदर्भात मला काही महिन्यांपूर्वी भेटायला आल्या होत्या. मेडिकल कारणासाठी त्या सुट्टीवर होत्या. ड्युटीवर रुजू झाल्या नव्हत्या, त्यानंतर त्यांना हरीसालवरून बदली करायची होती, त्या माझ्या ऑफिसला मला भेटल्या."
"यापूर्वी रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई केली नाही," हा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. "IFS अधिकारी ही IFS अधिकाऱ्यांचीच बाजू घेणार", असाही उल्लेख सूसाईड नोटमध्ये आहे.