दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसमुळे एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही हा विषय त्यांनी उपस्थित केला होता.
विद्यार्थी आणि पालकांनीही या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. कोरोनामुळे निर्माण झालेला धोका, मर्यादित दळणवळण, विद्यार्थ्यांचे या काळात अभ्यासात झालेले नुकसान, या सगळ्याचा विचार करून एमपीएससीमार्फत २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
परिस्थितीचा आणि विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Maharashtra government has decided to postpone the MPSC exams due to the Covid19 pandemic.I congratulate Government of Maharashtra for this decision and request the central government to postpone the JEE/NEET exams as done in Maharashtra#PostponeJEENEET_Today
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 26, 2020
महाराष्ट्र सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत अभिनंदन. आता केंद्र सरकारनेही JEE-NEET च्या परीक्षा पुढे ढकलाव्या, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्याआधी धनंजय मुंडेंनी JEE-NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारकडे करावी, असं पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.
दुसरीकडे JEE-NEET परीक्षेवरुन ७ राज्य सुप्रीम कोर्टात जायच्या तयारीत आहेत. ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज सोनिया गांधींसोबत बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणस्वामी उपस्थित होते.