कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : आपल्या आक्रमक भूमिकेमुळे कायमच चर्चेत असणारे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी हिंगोली (Hingoli) कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. बांगर (Santosh Bangar) यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. तसेच त्यांनी कृषी विभागातील (Department of Agriculture) काही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत शिवराळ भाषेत झापलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यानंतर आता मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यांनी (Devendra Fadnavis) या प्रकरणाची गंभीर दखल घेत बांगर (Santosh Bangar) यांना झापलं आहे. (CM eknath shinde warn hingoli mla santosh bangar)
या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संतोष बांगर यांना समज दिली आहे. संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे तसेच कार्यालय फोडल्यामुळे सरकारची बदनामी होत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी समज दिली आहे.
"आपण सरकार मध्ये आहोत याचे भान ठेवून काम करा. मतदार संघातील कामे प्रशासकिय नियमानुसार करुन घ्या तसेच विरोधकांना टिकेची संधी देऊ नका," असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते संतोष बांगर?
“पीडित शेतकरी सकाळी दहा वाजल्यापासून येथे कार्यालयात येऊन बसले आहेत. तरीही अधिकाऱ्यांचा थांगपत्ता नाही. तुमच्या बापाची पेंड आहे का? तुम्ही कितीही वाजता येता, तुमची प्रतीक्षा करायला आम्ही तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतरच तुम्हाला समजेल… आजच्या आज हा निर्णय झाला पाहिजे आणि संबंधित कंपनी बॅन झाली पाहिजे, अशा शब्दांत संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना झापलं होतं.