MMRDA employees grace grants : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी दिवाळीनिमित्त 42,350 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे केली. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यास मंजुरी देत असल्याचे परिपत्रक एमएमआरडीएचे (MMRDA) आयुक्त डॉ.संजय मुखर्जी (IAS) यांनी जारी केले आहे.
गेल्या वर्षी एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून 38550 रुपये अदा करण्यात आले होते. यावर्षी त्यात 10 टक्क्यांनी वाढ करून सानुग्रह अनुदानाची रक्कम 42,350 रुपये इतकी करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदानाची घोषणा केल्यानंतर एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या कर्मचाऱ्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची घोषणा करतेवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की "दिवाळी हा आनंदाचा सण असून यावर्षी दिवाळीचा गोडवा द्विगुणित व्हावा यासाठी आम्ही एमएमआरडीएच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 42,350 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. समस्त सरकारी कर्मचारी हे राज्य सरकारच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात 10 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या सरकारी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा आनंद बहुमोल आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी यावेळी बोलताना म्हटले की,"हे सानुग्रह अनुदान म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच म्हणावी लागेल. एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी या गोड बातमीनंतर अधिक आनंदात जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा "