नागपूर : अनेक तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र कामठीतील भाजपा उमेदवारीचा तिढा अखेरच्या क्षणापर्यंत कायम आहे. भाजपकडून ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा होती. कामठी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र आता कामठीच्या जागेसाठी अनिल निदान यांचे नाव पुढे येत आहे.
खडसे, तावडे आणि प्रकाश मेहतांच्या पाठोपाठ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचाही पत्ता कापला गेला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत कामठी मतदारसंघातून उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. या जागेसाठी ज्योती बावनकुळे की अनिल निदान यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गडकरींच्या घरी मुख्यमंत्र्यांसह शहरातल्या पाचही उमेदवारांसह बावनकुळे दिसले. बावनकुळेंबाबत मुख्यमंत्री आणि गडकरींमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असताना या नाट्यमय घडामोडी घडल्या.