चंद्रपूर: जिल्ह्यामधल्या ब्रम्हपुरी तालुक्यातल्या पवनपार इथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. जैराम कोल्हे असं मृत्यू पावलेल्या वृद्धाचं नाव आहे. झाडू बनवण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी सिंदी जातीची पानं आणण्यासाठी, ६५ वर्षीय जैराम कोल्हे मंगळवारी सकाळी जंगलात गेले होते. त्यावेळी वाघानं हल्ला करून त्यांना ठार मारलं.
वाघाने पर्यटक जिप्सीवर चाल केल्याची घटना समोर आलीय. चिमूर तालुक्याच्या हद्दीतील मदनापूर जंगल म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बाह्य भाग. या बफर क्षेत्रात पर्यटक नियमित सफरीवर असताना ही घटना घडलीय. पर्यटक जिप्सीवर हल्ला करण्यासाठी वाघाने कशारितीने चाल केली याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. वाघ समोर चाल करुन येत असल्याचे पाहून जिप्सी चालकाची जणू काही बोबडीच वळली आणि त्यानं जिप्सी पळवून नेणं शहाणपणाचं समजलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बफर क्षेत्र कार्यालयाने या घटनेची गंभीर नोंद घेतली आहे. पर्यटकांना कोअर क्षेत्र असो वा बफर सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्यात.