दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा प्राथमिक मसुदा तयार केल्यामुळे महाशिवआघाडीनं सत्ता स्थापनेच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. आता तिन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये बैठक होण्याची ही शक्यता आहे. गुरुवारी तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये मंत्रिपदाबाबत देखील चर्चा झाल्याचं कळतं आहे.
कोणत्याही पक्षात खातेवाटपावरुन नाराजी राहू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये हे समसमान खातेवाटप करण्यात आल्याचं कळतं आहे. खातेवाटप करताना आधी ९ महत्त्वाच्या खात्यांची यादी करण्यात आली. त्यानंतर ती खाती ३ पक्षांमध्ये वाटप करण्यात आली. तिन्ही पक्षाचे नेते सकारात्मक दिसत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचा महाशिवआघाडीचा प्रयत्न असणार आहे.
मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणार आहे तर गृह खातं हे राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता आहे. महत्वाची खाती ही प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार आहेत. ग्रामीण, शहरी भागाशी संबंधित असलेली खाती प्रत्येक पक्ष वाटून घेणार आहेत. गृह, अर्थ, उद्योग खाती एका पक्षाकडे असेल. महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुस-या पक्षाकडे असेल तर नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिस-या पक्षाकडे असेल. सोबतच ग्रामीण भागाशी संबंधित खात्यांपैकी कृषी खातं एका पक्षाकडे, सहकार खातं एकाकडे आणि ग्रामविकास खातं एकाकडे असेल.