Bhaskar Jadhav Black and White: मी राष्ट्रवादी सोडायला नको होती, भास्कर जाधवांचं मोठं विधान, पण असं का म्हणाले?

Bhaskar Jadhav Black and White: कोकणातील नेते आणि ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडायला नको होता असं मोठं विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना आपण नैतिकतेने बाहेर पडलो असं सांगितलं आहे.   

Updated: Mar 16, 2023, 02:05 PM IST
Bhaskar Jadhav Black and White: मी राष्ट्रवादी सोडायला नको होती, भास्कर जाधवांचं मोठं विधान, पण असं का म्हणाले? title=

Bhaskar Jadhav Black and White: कोकणातील नेते आणि ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मोठं विधान केलं आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडायला नको होता ते म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना तसंच राष्ट्रवादी पक्ष सोडताना आपण नैतिकतेने बाहेर पडलो असं सांगत शिंदे गटाला लक्ष्य केलं. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी भास्कर जाधव यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली. 

भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

"ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी आपणही काही नैतिक जबाबदारी स्विकारावी लागते. शिवसेना माझ्या आयुष्यात कधी सोडेन असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण कधीकधी नियतीच्या निर्णयापुढं आपली काही मतं, निर्णय फिके पडतात आणि आपण आत्मसमर्पण करतो. त्यामुळे मला शिवसेना सोडावी लागली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडायला नको होता हे मी आजही मान्य करतो. पण माझ्या मते पक्षांतर करणं हे कदापि चांगलं नाही. पण कधीकधी आपण नियतीच्या पुढे हतबल असतो," असं भास्कर जाधव म्हणाले.   

दरम्यान यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं कारण विचारलं असता ते म्हणाले, "त्यासंदर्भात मी कधीही भाष्य केलं नाही. कोणावरही टीका केली नाही. शिवसेना सोडतानाही मी त्यांच्यावरही टीका केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांबद्दलही प्रश्न येत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना तेव्हा माझ्याकडे काही ठोस कारण होतं असं मला आज वाटत नाही. त्यावेळीला काही पक्षांतरर्गत गोष्टी झाल्या असतील. त्या घटना टाळता आल्या असत्या. त्यांनी त्या टाळल्या नाहीत आणि मीदेखील तडकाफडकी निर्णय घेतला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचं माझ्याकडे कोणतंही सबळ कारण नाही".

बंडखोर आमदारांवर टीका

"बंडखोरी करुन जे गेले त्यांनी अनेक कारणं सांगितली असून, आता ते उघडे पडायला लागले आहेत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी हरकत घेतली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस जास्त निधी घेतो अशी तीन कारणं त्यांनी सांगितली. तुम्हाला जर खरोखरच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचं होतं, हिंदुत्व पुढे घेऊन जाऊ असं वाटत होतं तर मंत्रिमंडळात शपथ का घेतली होती. उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली ओढताना जे धाडस दाखवलं तेच त्यांचीशी बोलत दाखवायला हवं होतं. सगळा स्वार्थ आहे," अशी टीका भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर केली.

"कोकणात असंस्कृत भाषा वापरली, एखाद्यावर टीका केली तर लोक सभा सोडून जातात. पण वापरली जाणारी भाषा योग्य नाही. मला दोन मुलं आहेत पण त्यांच्याबद्दल कोणाच्या तक्रारी आहेत का? पण नारायण राणे यांची दोन मुलं कोणालाच सोडत नाही. कोणाबद्दल, कसं आणि कोणत्या भाषेत बोलावं याचं कोणतंही ताळतंत्र नाह," अशी टीका यावेळी भास्कर जाधव यांनी केली. 

नारायण राणेंशी वैर का?
 

"नारायण राणे आणि माझं काही वैर नाही. त्यांच्या आधी मी शिवसेना सोडली. मी त्यांच्यासोबत यावं अशी त्यांची इच्छा होती. एकदा त्यांनी मला बोलावलं आणि आठ दिवसांत मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याचं सांगितलं. जर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही आलात तर लोक हा स्वार्थासाठी आला असं म्हणतील आणि मला तुमच्यासाठी काही करता येणार नाही. पण मी त्यांना तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी तुमच्या पक्षात येणार नाही हे स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतरही आमचे संबंध चांगले होतं. पण नंतर त्यांनी माझं कार्यालय फोडलं. तुमच्याकडे सत्ता, पैसा, मस्ती असेल तर माझ्याकडेही स्वाभिमान आहे. मी त्यांची सहा कार्यालयं फोडून टाकली. तेव्हापासून हा शाब्दिक सामना रंगला आहे," असा खुलासा भास्कर जाधव यांनी केला.

भाजपात प्रवेश करणार का?

"मी जे काम करेन ते उजळ माथ्याने आणि उघड भूमिका घेत करेन. भाजपा माझं घर जाळण्यापर्यंत पोहोचली होती. पण मी घाबरलेलो नाही. त्यामुळे भाजपात जाण्याची कधी चर्चा किंवा संबंधच आलेला नाही," असं भास्कर जाधव यांनी स्पष्ट सांगितलं. 

"भाजपाची ऑफर आली तरी मी जाणार नाही, पण मी नाकाला जीभ लावत नाहीत. ज्या दिवशी शिवसेना सोडण्याची वेळ आली तेव्हापासून मी व्यथित आहे. राजकारणात कोणाच्या वाटयाला काय येईल सांगता येत नाही. मी कधी शिवसेना सोडेन असं वाटलं नव्हतं. त्यामुळे मी राजकारणात असलो तरी राजकारणावरील विश्वास उडाला आहे. जर ती भाजपा अडवाणी, वाजपेयी यांची असती तर गेलो असतो. पण तत्वज्ञान सांगणाऱ्या भाजपाने राजकारणाचा स्तर ओलांडला असून, महाराष्ट्राचा सुसंकृतपणा मातीत घालवला आहे. त्याची मला भयंकर चीड आहे," असं सांगत भास्कर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.