दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजप आमदार राजेंद्र पटणी यांनीच देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.
भाजपा आमदार राजेंद्र पटणी यांनी समाजकल्याण विभागातील भ्रष्टाचार विधानसभेत मांडला आहे. मागासवर्गीयांच्या घरकुल योजनेसाठी घरावर लावण्यासाठी घेतलेल्या पाट्यांमध्ये घोटाळा झाल्याचं राजेंद्र पटणी यांनी म्हटलं आहे.
घरकूल बांधले नसताना दीड लाख पाट्या विकत घेतल्या. इतकचं नाही तर, एका पाटीसाठी १५०० हजार रुपये किंमत मोजली असल्याचं राजेंद्र पटणी यांनी म्हटलं आहे.
एक पाटी लावण्यासाठी दोन स्क्रू ९० रुपयांना विकत घेतले असल्याचाही प्रकार समोर आला आहे.
८० हजार पाट्या खरेदी करण्याची ऑर्डर मंत्रालयातून निघाली. त्यानंतर समाजकल्याण आयुक्तांनी १२ कोटींच्या पाट्या खरेदी केल्या त्या पडून आहेत.
पुरवठादार मंत्र्यांना साहित्य खरेदीचे पत्र देतो, मंत्री पूट अप असा शेरा लिहतात आणि अधिकारी त्या आधारे गरज नसताना वस्तू विकत घेतात. अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी केली, एक्स्पायरी डेट निघून गेली तरी ही औषधे पडून आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लहान चपला घेण्याऐवजी १० आणि ११ नंबरच्या चपला घेतल्या आणि त्याचे वाटप झाले नाही.
वसतिगृह बांधले नसताना त्या ठिकाणी बसवण्यासाठी टीव्ही विकत घेतले. २० हजार रुपयांचा एक टीव्ही ९० हजार रुपयांना विकत घेतले. इतकचं नाही तर हे टीव्ही अधिकार्यांच्या घरी गेले.
त्यामुळे समाजकल्याण विभागात झालेल्या या सर्व घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे असंही आमदार राजेंद्र पटणी यांनी म्हटलं आहे.