Maharashtra government approves bike taxis : परिवहन विभागाने राज्याच वाहतुकीच्या सेवा सुविधा वाढवण्याच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत मुंबईत बाईक टॅक्सी सुरु होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. बाईक टॅक्सी सुरु करण्याच्याअनुषंगाने परवाने दिले जाणार आहेत.
मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहेत. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या वाहतुकीची साधने अपुरी पडत आहेत. त्यामुळे ठिकाणी वाहतुकीचे पर्याय आणि सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते अशा ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना झा समितीच्या अहवालात करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाइक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती. मुंबईत बाईक टॅक्सी सुरु करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.
पुढच्या दोन महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्विस मुंबईत सुरु होणार आहेत. बाईक टॅक्सी सुरु करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवतांना बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असेल अशी अट ठेवली जाणार आहे. ओला, उबेर प्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
बस, रिक्षाची रांग.. रिक्षा- टॅक्सीचालकांच्या मिळणा-या नकारामुळे हैराण झालेल्या नागरिकांना बाईक टॅक्सीचा पर्याय लवकरच मिळणार आहे. त्यामुळे कमी खर्चात, कमी वेळात प्रवास शक्य होणार आहे. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकते.
एका किलोमीटरसाठी 3 रूपये बाईक टॅक्सीचं भाडं असेल. त्यामुळे पैसे, वेळ वाचणार आहे. त्या बाईक टॅक्सीत GPS आवश्यक आहे. तसंच पाठी बसणा-याला हेल्मेट बंधनकारक असेल. 50 दुचाकी वाहनं त्या संस्थेकडे असणंही आवश्यक आहे. एकीकडे बाईक टॅक्सीसाठी अनुकूल वातावरण असलं तरी दुसरीकडे रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांचा याला विरोध आहे. पण मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात ही बाईक टॅक्सी सुरू झाली तर प्रवाशांची वाहतूक कोंडातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारनं बाईक टॅक्सी हे धोरण दोन वर्षांपूर्वीच आणलं. त्यानुसार गोवा, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश यासह इतर राज्यांमध्येही बाईक टॅक्सीला परवानगी आहे.