Nitin Desai Death Case : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. रायगड पोलिसांची प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केल्याचे दिसत आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ई सी एल फायनान्स कंपनी, एडल वाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना रायगड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. चौकशीसाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
8ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती देण्याचे आदेश रायगड पोलिसांनी या नोटीसच्या माध्यमातून दिले आहेत. आतापर्यंत या कंपनीच्या 5 संचालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यापूर्वीच दाखल करण्यात आलाय. गुन्ह्यासंदर्भात आतापर्यंत 11 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येनंतर देसाई कुटुंबीयांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. कुटुंबाच्या वतीनं भावना व्यक्त करताना देसाईंची थोरली कन्या मानसी देसाई यांना अश्रू अनावर झाले. माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही. मात्र कर्ज देणा-या कंपनीनं आश्वासन पाळलं नाही, अशी व्यथा मानसी देसाई हिनं व्यक्त केलीय. याबाबत चौकशी करून बाबांना न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केली. एनडी स्टुडिओ ताब्यात घेऊन राज्य सरकारनं त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करावी, असं भावनिक आवाहनही त्यांनी केले.
ख्यातनाम कला दिग्दर्शक आणि एनडी स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एडलवाईज आणि ECL फायनान्स कंपनीच्या अधिका-यांसह 5 जणांविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलीय. नेहा नितीन देसाईंच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलीय. एडलवाईज आणि ECL फायनान्स कंपनी पदाधिका-यांनी कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून देसाईंनी आत्महत्या केली, अशी लेखी तक्रार नेहा नितीन देसाई यांनी ४ ऑगस्टला दिली होती. गेल्या 2 ऑगस्टला एनडी स्टुडिओत देसाईंनी गळफास लावून आत्महत्या केली होती. नितिन देसाईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होते. येथेच त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले.