BMC ची मोठी कारवाई; अग्निप्रतिबंधक सुरक्षा उपाययोजना नसल्याने मुंबईतील 17 मॉल्सला बजावल्या नोटिसा

मागील 7 दिवसांत एकूण 68 मॉल्समध्ये मुंबई अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात आली. तपसणीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. 

Updated: Jun 3, 2024, 09:53 PM IST
BMC ची मोठी कारवाई; अग्निप्रतिबंधक सुरक्षा उपाययोजना नसल्याने मुंबईतील 17 मॉल्सला बजावल्या नोटिसा title=

BMC Notice Mall In Mumbai : मुंबई  महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने दिनांक 26 मे  ते 30 मे 2024 या कालावधीत मुंबईतील 68 मॉलची आकस्मिक तपासणी केली. या तपासणीत 48 मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक व सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करण्यात आल्याचे आढळून आले. तर, अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या 17 मॉल व्यवस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावलेल्यांपैकी एक असलेल्या मालाड पश्चिम येथील मॉलमध्ये  3 जून 2024 रोजी आग लागल्याची दुर्घटना घडली. याची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने सदर मॉल असुरक्षित घोषित करून कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. 

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी आणि उप आयुक्त (वित्त)  प्रशांत गायकवाड यांनी मुंबई अग्निशमन दलास महानगरपालिका हद्दीतील मॉल्सची आकस्मिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई अग्निशमन दलाच्या विशेष पथकाने 26 मे 2024 ते 30 मे 2024 या कालावधीत मुंबईतील विविध 68 मॉलची आकस्मिक तपासणी केली. 

एकूण 68 मॉल्सपैकी 48 मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची व सुरक्षेची पूर्तता करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तर 17 मॉल व्यवस्थापनांनी अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या 17 मॉल्सला महाराष्ट्र अग्निबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना 2006 अन्वये 30 दिवसांचा कालावधी देत कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या 30 दिवसांत आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, या 17 मॉलपैकी मालाड पश्चिम येथील ‘मेसर्स द मॉल’ या मॉलला गत आठवड्यात आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. तथापि, 3 जून 2024 रोजी याच मॉलमध्ये आगीची दुर्घटना घडली. याची गंभीर दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने सदर मॉल असुरक्षित घोषित करून कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. या कारवाईत मुंबई अग्निशमन दलाने महाराष्ट्र अग्निबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना 2006 अन्वये देण्यात आलेली ‘फायर अॅक्ट नोटीस’ रद्द करून मॉल ‘तात्काळ असुरक्षित’ घोषित करण्याची सक्त कारवाई केली आहे. तसेच मॉल व्यवस्थापनाने अग्निशमन सुरक्षा यंत्रणाबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने नव्याने नोटिस बजावली. त्यानुसार सदर मॉलची वीज जोडणी आणि पाणी जोडणी खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच मालाड पोलिस ठाण्यामार्फत सदर मॉल रिकामा करण्यास व अभियोग दाखल करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संतोष सावंत यांनी सांगितले.