उत्तर प्रदेशातील घडामोडींत भुजबळांनी दाखविले ओबीसीचे बळ?

काय म्हणाले पहा छगन भुजबळ

Updated: Jan 14, 2022, 08:37 PM IST
उत्तर प्रदेशातील घडामोडींत भुजबळांनी दाखविले ओबीसीचे बळ? title=

नाशिक : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारमधील ३ मंत्र्यांनी आणि १३ आमदारांनी आतापर्यंत भाजपाची साथ सोडून अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात  प्रवेश केला आहे. भाजप सोडून जाताना या सर्वानी मुख्यमंत्री योगी यांच्यावर आरोप केले.

ज्या अपेक्षेने गरीब, दलित, उपेक्षित मजूर, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, छोटे व्यापारी यांनी भाजपाला मतदान केले. उत्तरप्रदेशची सत्ता दिली. त्या घटकांची आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींची योगी सरकारने सातत्याने उपेक्षा केली आहे. त्यामुळे राजीनामा देत असल्याचा आरोप मंत्री आणि आमदारांनी केला होता.

मात्र, भाजपाला एका पाठोपाठ एक धक्के देणाऱ्या या धक्कातंत्राची सुरवात झाली होती ती दिल्लीत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेने महिन्याभरापूर्वी दिल्लीत ओबीसी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला देशभरातील ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती.   

ओबीसी राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी उत्तर प्रदेशमधील महत्वाचे ओबीसी नेते मौर्य सुद्धा उपस्थित होते. या परिषदेतच भाजपला एकटे पाडण्याची रणनीती शिजली असावी अशी चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरू आहे. याला खुद्द भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.

नाशिक येथील कोरोना परिस्थितीचा आढावा भुजबळ यांनी आज घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशातील सध्याच्या घडामोडींची चर्चा सुरू होती. आता हळूहळू त्याला फळ येत आहेत असं सूचक वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे या घडलेल्या घडामोडी या अप्रत्यक्षपणे घडल्या कि ठरवून केल्या याचीच चर्चा होत आहे.

इंपरिकल डेटा लवकरच जमा करू 
राज्यात ओबीसी आरक्षणासाठी इंपरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यासंदर्भात राज्य मागास आयोगाची एक बैठक झाली आहे. महसूल विभागामार्फत हा डेटा जमा करण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभागाला निधी देण्यात आला आहे. मध्यप्रदेश राज्यांप्रमाणेच आपण महाराष्ट्रातही काम सुरु करू असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.