शशिकांत पाटील, लातूर, झी मीडिया : राज्यातील लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेला मतदारसंघ म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी नेतृत्व केलेल्या या मतदारसंघातून विलासरावांचे जेष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे प्रतिनिधित्व करतात. ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे शैलेश लाहोटी यांचे सलग दुसऱ्यांदा तर वंचित आघाडीच्या राजा मणियार यांचे आवाहन आहे. त्यामुळे लातूर शहर मतदारसंघातील लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
लातूर हे मराठवाड्यातील एक मोठं शहर आहे. आपल्या अनोख्या शैक्षणिक पॅटर्नमुळे राज्यात-देशात परिचित असलेले शहर. कधी भूकंप, दुष्काळ, पाण्याची रेल्वे अशा नैसर्गिक संकटांमुळे चर्चेत असणारे लातूर येथील दिग्गज राजकारण्यांमुळेही ओळखलं जातं.
काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळेही लातूरचे राजकीय वजन देशाने पाहिलं आहे. अशा या लातूर शहर मतदारसंघातून दिवंगत विलासराव देशमुख यांचे जेष्ठ चिरंजीव अमित देशमुख हे २००९ पासून विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत.
ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. विलासराव यांच्या निधनानंतरची अमित यांची ही दुसरी निवडणूक आहे. सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या अमित देशमुख यांना भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचे सलग दुसऱ्यांदा आवाहन आहे.
तर वंचित आघाडीचे राजा मणियार यांचेही आवाहन असणार आहे. लातूरला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असून भाजप सरकारने उजनी धरणाचे पाणी मिळवून न दिल्यामुळे हाच कळीचा मुद्दा भाजप उमेदवाराच्या पथ्यावर येईल असा दावा अमित देशमुख करीत आहेत.
काँग्रेसचा गड असणारा लातूर जिल्हा हा विलासराव देशमुख निधनानंतर पूर्णपणे भाजपमय झालाय. लातूर महानगरपालिका, जिल्हा परिषद सारख्या संस्थांवर भाजपचा कब्जा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेतही लातूर शहरातून भाजपला मतदाधिक्य आहे. त्यामुळे विकासाच्या रणनीतीवर आपण वरचढ ठरू असे भाजप उमेदवार शैलेश लाहोटीना वाटत आहे.
लातूरला उजनीचे पाणी मिळावे म्हणून आमदार म्हणून अमित देशमुखांनी काय प्रयत्न केले ? असा सवाल ते करीत आहेत. तर गेली २० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक असलेले वंचित आघाडीचे राजा मणियारही उभे आहेत. काँग्रेस आणि भाजपने उजनीच्या पाण्यावरून फसविल्याचा आरोपही मणियार यांनी केलाय.
लातूर शहर मतदारसंघात मुस्लिम, दलित, लिंगायत आणि त्याखालोखाल मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काचा मुस्लिम-दलित हा काँग्रेसकडेच राहतो की भाजप-वंचित आघाडी त्यात छेद करणार हे पाहणे रोचक ठरणार. त्यामुळे उजनीच्या पाण्याच्या मुद्द्यावरून लातूर शहर विधानसभेतील वातावरण तापले असून यामध्ये कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.