Amravati Lok Sabha Election : एकवेळ राजकारण सोडेन मात्र राणांचा प्रचार करणार नाही, अशी गर्जना शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी केली होती. फक्त घोषणा करुन ते थांबले नाहीत तर राणा दाम्पत्यांवर अडसूळांनी बोचरी टीकाही केली होती. अडसूळ आणि राणा हे कट्टर विरोधक... मात्र ज्या अडसुळांनी राणांवर एवढी टीका केली, तेच राणा दाम्पत्य मग थेट अडसूळ यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं. राणा (Navneet Rana) दाम्पत्य गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहिलंय. याच दाम्पत्याने अमरावतीत अडसूळांसोबत कट्टर राजकीय वैर पत्करलं. अमरावती हा शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा गड.. राणांना पहिल्या प्रयत्नात अडसूळांकडून पराभव स्वीकारावा लागला.मात्र त्या थांबल्या नाहीत.
2019 मध्ये आनंदराव अडसूळ शिवसेना भाजपा युतीचे अमरावतीचे उमेदवार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नवनीत राणांना पाठिंबा दिला आणि मोदी लाटेतही त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र अडसूळ आणि राणांचा वाद 2014 मध्येच सुरु झाला होता. 2014 मध्ये राणांनी अडसूळांवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर 2019 मध्ये अडसूळांनी नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला. मुंबई हायकोर्टाने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने नवनीत राणांची खासदारकी धोक्यात आली. सुप्रीम कोर्टाने हा निकाल रद्द करत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवल्याने त्यांना दिलासा मिळाला.
राणा दाम्पत्याने फक्त अडसूळांसोबत वैर पत्करलं नाही. तर राज्यातल्या मोठ्या नेत्यानाही शिंगावर घेतल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, प्रहारचे बच्चू कडू अशा स्थानिक नेत्यांसोबत वाद हे समीकरणच झालंय. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे जुने वाद राणा दाम्पत्याला महाग पडत असल्याचं दिसतंय. म्हणूनच राणा दाम्पत्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु झालंय. भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंचीही राणांनी भेट घेतली होती. आता त्यांनी अडसूळांची भेट घेतलीय.
दरम्यान, कट्टर वैरी आता एकमेकांमधलं राजकीय वैर मिटवणार का? अडसूळ आणि राणा या महायुतीतल्या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.