नाशिक : कांद्याचे दर वाढल्यानंतर आता लसणाच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या लसणाचे दर दोनशे रुपये तर गावठी लसणाचा भाव तीनशे रुपयांवर पोहचला आहे. मध्यप्रदेशातून येणाऱ्या लसणाची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत.
कांद्या पाठोपाठ आता लसणाच्या चवीनेही ठसका घेतलाय. रोजच्या जेवणात भाजीची चव वाढविण्याऱ्या कांद्याबरोबरच आता लसणाची चवही नकोशी झाल्याची परिस्थिती निर्माण झालीय. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यप्रदेशातून येणाऱ्या लसणाची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत.
मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात किलोला लसणाचे दर दोनशे रुपये तर, गावठी लसणाचा भाव तीनशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
देशात आणि राज्यात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. सामान्यांच्या ताटातून तर तो सध्या हद्दपार झाल्याचं चित्र आहे. भारतात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव वाढत आहे. नवा कांदा येण्यासाठी वेळ लागणार असल्याने कांद्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यांमध्ये द्राक्षबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे निर्यातीवरही विपरीत परिणाम होणार आहे. तसंच द्राक्षांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसतोय.