अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमध्ये ST महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. यात बसमधील 32 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला आहे.
अमरावती शहरातील नांदगाव पेठ पोलीसस्टेशन हद्दीतील पिंपळविहिर ते सावर्डी मार्गावर हा अपघात झाला आहे. नागपूर ते अकोट येथे जाणारी एमएच 40/ एक्यू 6433 क्रमांकाची बस अपघातग्रस्त झाली आहे. या एसटी बसने पिंपळविहीर ते सावर्डीदरम्यान समोर असलेल्या एमएच 20/ बीटी 7288 क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी एसटी बसमधून 34 ते 40 प्रवासी प्रवास करीत होते.
या भरधाव एसटीने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये एसटीतील प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुगणालय इर्विन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवळपास 32 किरकोळ जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.
8 फ्रेब्रुवाकी रोजी बीडच्या धारूर येथून औरंगाबादला जाणारी शिवशाही बस अपघात ग्रस्त झाली आहे. ही बस धारूर वरून औरंगाबादकडे निघाली असताना एका चौकातच या धावत्या बसचा टायर अचानक फुटला. यामुळे बसचा ड्रायव्हर गोंधळा. मात्र, त्याने सतर्कता दखवत बसवर नियंत्रण मिळवले आणि बस रसत्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकवली. दुभाजकावर धडकल्यामुळे बसचा स्पीड कमी झाला आणि बस मध्येच थांबली. ड्रायव्हरने बस दुभाजकावर नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. टायर फुटलेली बस इतरत्र धडकली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले होते.
एसटी महामंडळाच्या बसेस अर्थात लाल परी ग्रामीण भागातील जनतेचा मोठा आधार आहे. ग्रामीण भागातील 90 टक्के लोक प्रवासासाठी या लाल परीवर अवलंबून आहेत. मात्र, एसटी महामंडळाच्या बसेस वारंवार अपघातग्रस्त होत आहेत. नादुरुस्त गाड्या वापरून परिवहन मंडळ प्रवाशंच्या जीवाशी खेळत आहे का? असाही प्रश्न सध्या समोर येत आहे. लालपरी बससह शिवशाही देखील नादुरुस्त अवस्थेत पाहायला मिळत आहे. यामुळे डेपोतून निघताना या बसेसची तपासणी केली जात नाही का? असा प्रश्न देखील प्रवाशांनी उपस्थित केला आहे.