Rape on Cow: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. हसन खान (Hasan Khan) नावाच्या एका कपडा व्यापाऱ्याने चक्क गाईवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले आहेत. 24 मे रोजी मध्यरात्री हा संतापजनक प्रकार घडला आहे. हा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे. यानंतर शहरात संतापाची लाट पसरली असून हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आंदोलन केलं आहे. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
छत्तीसगडच्या भिलाई शहरात ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांनी जमूल पोलीस स्थानकाला घेराव घातला. गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 24 तासात आरोपीला अटक केली.
भिलाई हाऊसिंग बोर्ड कॉलनीत हा सगळा प्रकार घडला आहे. फिरोज खान आणि त्याचं कुटुंब गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथे राहत आहे. त्यांची या परिसरात दोन ते तीन घरं आहेत. हसन खान हा तरुण दिल्लीमधून या कुटुंबाकडे आला होता. कपडा विकण्याच्या व्यवसायात तो सहभागी झाला होता. 24 मे रोजी मध्यरात्री हसन खानने गाईवर लैंगिक अत्याचाराचा निर्घृण प्रकार केला. तेथे असलेल्या सीसीटीव्हीत त्याचं हे कृत्य कैद झालं.
स्थानिकांनी हे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर भाजपा नेत्यांना याची माहिती दिली. यानंतर भाजपा, भारतीय जनता युवा मोर्चा आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते एकत्र जमल पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस स्टेशनला घेराव घालत त्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने आयपीएस प्रभात कुमार आणि सीएसपी कॅन्टोन्मेंट आशिष बनचोरे यांनी हे प्रकरण हाती घातेलं. कॅन्टोन्मेंट आणि सुपेला पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे चौकशी केली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हसन खानला अटक केली.
या घटनेबाबत बोलताना बजरंग दलाचे कार्यकर्ते दीपक यादव यांनी सांगितलं की, “24 मे रोजी एका व्यक्तीने गायीवर बलात्कार केला असल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आम्ही या घटनेची तक्रार जमूल पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर आमचे सर्व गौरक्षक आणि हिंदू बांधव पोलीस प्रशासनासह आरोपीच्या निवासस्थानाकडे निघाले. आम्ही आलो तेव्हा निवासस्थानाच्या मालकाने आम्हाला आरोपीला ओळखत नसल्याचं सांगितलं. नंतर त्याने तो तिथे काम करत असल्याचं स्पष्ट केलं".
"अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना अजिबात सोडले जाऊ नये. अन्यथा, संपूर्ण हिंदू समाज आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करेल," असा इशारा त्यांनी दिला आहे.