Kanpur Mayor Viral Video: राजकीय वर्तुळात एकिकडे अमित शाह यांच्या व्हिडीओची चर्चा असताना आणि इतर नेतेमंडळींच्याही व्हायरल व्हिडीओंचीच चर्चा सुरु असताना सरकारी कारभारात डोकावण्याची संधी एका व्हिडीओनं दिली आहे. या व्हिडीओमध्ये संतापाच्या भरात महापौरानी केलेलं कृत्य अनेकांच्या नजरा वळवत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणि एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओमध्ये कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे शहर विकास कार्यालयामध्ये नालेसफाई आणि इतर काही मुद्द्यांवर आधारित बैठकीदरम्यान संतप्त असल्याचं पाहायला मिळालं.
सूत्रांच्या माहितीनुसार कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी शहरातील नालेसफाईच्या कामावरून एका अधिकाऱ्यानं दिशाभूल करणारी माहिती देल आणि दैनंदिन कामांमध्येही निराशाजनक कामगिरी केल्याप्रकरणी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. बुधवारी (12 जून 2024) रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथं प्रमिला पांडे यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांसमोरच कामाच हयगय करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यांची वागणूक आणि सारवासारव पाहून पांडे यांचा पारा इतका चढला की, त्यांनी समोर असणारी कागदपत्रांची फाईलच अधिकाऱ्यांसमोर फेकली.
'तुम्ही मला मूर्ख समजता का...' असं म्हणत त्यांनी ताटकळत असणाऱ्या कामावर सडकून टीका केली. नालेसफाईसंबंधित काही कामांविषयी पांडे यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा देणारी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत मे महिन्याची फाईल मागितली. पण, त्या अधिकाऱ्यानं मार्च महिन्याची फाईल पुढे केली आणि इथंच महापौर पांडे संतापल्या.
#WATCH | Uttar Pradesh: Kanpur Mayor Pramila Pandey throws a file at an officer during a meeting of officials held on drain cleaning and other issues in the Kanpur Municipal Corporation office. pic.twitter.com/rsrEQHBveg
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 12, 2024
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी आपली मतं मांडली. एकिकडे काहींनी पांडे यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. तर, दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी नालेसफाईसारखी महत्त्वाची कामं वेळच्या वेळी झालीच पाहिजेच असा सूर आळवत अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे असं स्पष्ट मत मांडलं.