नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रोज काही तणावपूर्ण घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारीही भारतावर पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा आणखी एक प्रयत्न केला गेल्याचं पाहायला मिळालं. भारतीय हद्दीत पाकिस्तानचे काही ड्रोन, चार एफ-१६ लढाऊ विमान यांची हालचाल भारताच्या रडारने हेरली. पण, त्यांच्या या घुसखोरीला वायुदलाने उत्तर देत ही सारी विमानं परतवून लावली. पंजाबच्या खेमकरण भागात ही घटना घडली.
सूत्रांचा हवाला देत 'एएनआय'ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारताच्या हद्दीजवळ पाकिस्तानचे ड्रोन पाहिल्यानंतर लगेचच वायुदलाच्या सुखोई आणि मिराज २०००च्या मदतीने पाकिस्तानची ही विमानं परतवून लावण्यात आली.
साधारण महिनाभरापूर्वी भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकनंतर भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या कारवायांमध्ये पाककडून वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. भारताच्या सीमेपाशी पाकिस्तानचे ड्रोनही अनेकदा घोंगावताना पाहण्यात आलं आहे. शेजारी राष्ट्राकडून होणाऱ्या या सर्व हाचलाची पाहता भारतीय सैन्याकडूनही प्रसंगानुरूप योग्य ते उत्तर देण्यात येत आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये का वाढला तणाव?
१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून जम्मू- काश्मीर येथील पुलवामा परिसरात सीआरपीएफ जवानांच्या बसच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला घडवून आणण्यात आला होता. ज्यामध्ये जवळपास ४० जवानांचे प्राण गेले. या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात असणाऱ्या जैशच्या तळांवर भारताकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जैशच्या तळांचं मोठं नुकतसाम झालं असून दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचंही समोर आलं.
भारताच्या याच हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडूनही वायुदलाच्या सहाय्याने सीमेलगतच्या भागात सतत तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. किंबहुना बालाकोट हल्ल्याच्या नंतरच पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांनी भारतीय हद्दी घुसखोरी केली होती. ज्यामध्ये लष्कराच्या तळांवर निशाणा साधण्याची आखणीही करण्यात आली होती. पण, भारतीय वायुदलाकडून हा हल्ला परतवून लावण्यात आला होता.