Video: डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात लगावणं पडलं महागात, वाहतूक पोलिसाला मिळाली अशी शिक्षा

एका क्षुल्लक कारणावरून वाहतूक हवालदार एका डिलिव्हरी बॉयला कानशिलात लगावताना दिसत आहे.

Updated: Jun 7, 2022, 02:44 PM IST
Video: डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात लगावणं पडलं महागात, वाहतूक पोलिसाला मिळाली अशी शिक्षा title=

नवी दिल्ली: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत एका क्षुल्लक कारणावरून वाहतूक हवालदार एका डिलिव्हरी बॉयला कानशिलात लगावताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला स्विगी डिलिव्हरी बॉयवर हात उगारताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्याच्या हातातून मोबाईलही हिसकावून घेतल्याचं दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.या व्हायरल व्हिडीओची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. तसेच वाहतूक हवालदाराला त्याच्या कृत्याबाबत शिक्षा देण्यात आली आहे.

सिंगनल्लूर पोलीस स्टेशनशी संलग्न ग्रेड-1 वाहतूक हवालदार सतीश यांनी शुक्रवारी अविनाशी रोडच्या ट्रॅफिक चौकात डिलिव्हरी बॉयला कानशिलात लगावली होती. व्हायरल व्हिडीओनंतर या प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. कारवाई करत वाहतूक हवालदाराची नियंत्रण कक्षात बदली केली.

38 वर्षीय मोहनसुंदरम गेल्या दोन वर्षांपासून स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मोहनसुंदरम यांच्या लक्षात आले की, एक खासगी स्कूल बस चालक भरधाव वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवत आहे. एका मॉलजवळ बस दुचाकीला आणि एका वाटसरूला धडकणार होती. मोहनसुंदरम यांनी बसचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर तिथे आलेल्या सतीश यांनी या स्कूल बसचा मालक कोण आहे, माहिती आहे का? असा प्रश्न विचारला. जर कोणता प्रश्न उद्भवला तर पोलीस त्याकडे बघतील असं सांगितलं आणि कानशिलात लगावली.

पोलिसांनी सांगितले की, मोहनसुंदरम यांनी शनिवारी शहर पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे अधिकाऱ्यांनी पोलीस हवालदाराची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.