पणजी : गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता उद्या होण्याची चिन्हं आहेत. जुन्या मंत्रिमंडळातून छोट्या पक्षांच्या पाच मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे. विजय सरदेसाई, रोहन खवटे, विनोद पालेकर, जयेश साळगावकर आणि गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार आहे. तर त्यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांना संधी दिली जाणार आहे. रात्री उशिरा ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं आता उद्याच शपथविधी होईल, असं समजतं आहे.
काँग्रेसचे दहा आमदार गळाला लागल्यामुळं भाजपनं मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्यामुळं गोव्याच्या राजकारणात कमालीचं महत्त्व असलेल्या छोट्या पक्षांचं अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व दहा आमदारांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला आहे.
भाजपने काँग्रेसला गोव्यामध्ये जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना देखीव भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्राची पुनरावृत्ती गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना आहे.
१५ पैकी १० आमदार फुटल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई होणार नाही. कारण दोनतृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे.