भरतपूर, राजस्थान : अनेक स्वप्न घेऊन तीनं सैन्यदलात सेवा देणाऱ्या पतीचा हात धरत नवीन घरात प्रवेश केला... पण तिची आयुष्यभराची स्वप्न लग्नानंतर केवळ १७ दिवसांतच उद्ध्वस्त झाली... पण ती डगमगली नाही... 'ती'नं शहीद पतीच्या पार्थिवाला खांदा दिलाच पण केवळ १७ दिवसांसाठी का होईना पण शहिदाची पत्नी म्हणून मान मिळाल्याचा आपल्याला गर्व असल्याचं 'ती'नं म्हटलंय. या विरांगनेचं नाव आहे पूनम कटारा...
शहीद सौरभ कटारा यांच्या पार्थिवावर सैन्य सन्मानासोबत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शहीद सौरभ यांचा पार्थिव देह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना त्यांची पत्नी पूनम कटारा यांनी आपला खांदा दिला. यावेळी, दुखावेगानं त्यांना भोवळ येत होती... त्यांचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते...
भोवळ आलेल्या पूनमला सावरणाऱ्या भाऊ आणि वडिलांना तिनं ठामपणे आपल्याला १७ दिवसांसाठी का होईना पण शहीदाची पत्नी असण्याचा आपल्याला गर्व असल्याचं म्हटलं. पतीनं देशासाठी प्राणांची आहुती दिल्याचा अभिमान पूनमला आहे.
'शहीदों की चिंताओं पर लगेंगे हर बरस मेले ,वतन पर मिटने वालों का बस यही आखिरी निशाँ होगा...' असंच काहीसं दृश्यं राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात पाहायला मिळालं. शहीद सौरभ कटारा याचा तिरंग्यातला पार्थिव देह बरौली गावात दाखल झाला आणि 'सौरभ कटारा अमर रहे'च्या नाऱ्यानं सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
शहीद सौरभ कटारा आणि त्यांच्या मोठ्या भावाचा विवाह ८ डिसेंबर २०१९ रोजी एकाच मंडपात पार पडला होता. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील अनुक्रमे पूनम आणि पूजा या दोन बहिणींसोबत कटारा बंधु सप्तपदी चालले. पूनम यांच्यासोबत शहीद सौरभ यांनी आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाकाही घेतल्या. पण विवाहानंतर त्यांना केवळ १७ दिवसांचंच आयुष्य मिळेल, हे कुणाला माहीत होतं... पूनमच्या हातावरची मेहंदीही नीटशी निघाली नसेल आणि त्याच हातांनी शहीद पतीच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ तिच्यावर आली. शहीद सौरभ यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाही पूनम या भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्या.
सौरभ कटारा सोमवारी-मंगळवारी कूपवाडामध्ये झालेल्या स्फोटात शहीद झाले. ते भारतीय लष्करामध्ये चालक पदावर कार्यरत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी २०० फिल्ड रेजीमेंटपासून देशसेवेला प्रारंभ केला होता. घटना घडली त्यावेळी कार्बाइन घेऊन ते श्रीनगरहून कूपवाडाला जात होते. कूपवाडाजवळच्या त्यांच्या गाडीवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड फेकण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सौरभ यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यासोबत त्रिवेंद्रमचा आणखी एक जवान शहीद झाला.
शहीद सौरभ यांचे वडील नरेश कटारा हेदेखील आर्मीमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत्त झालेत.