राहुल गांधी यांना प्रजासत्ताक कार्यक्रमात सहाव्या रांगेत स्थान

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना यावेळी चक्क सहाव्या रांगेत बसवण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 26, 2018, 08:44 PM IST

नवी दिल्ली :  प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनाच्या वेळी वेगळंच राजकीय मानापमान नाट्य रंगलं. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना यावेळी चक्क सहाव्या रांगेत बसवण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. 

मागच्या रांगांमध्ये बसण्याची वेळ

राहुल गांधींना काँग्रेसचे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना अशाप्रकारे मागच्या रांगांमध्ये बसण्याची वेळ आलीय. 

हीन राजकारण करत असल्याचा आरोप

अगदी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा असताना त्यांनाही नेहमी पहिल्या रांगेत स्थान असायचं. मात्र राहुल गांधींना सहाव्या रांगेत बसवून मोदी सरकार हीन राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तसंच भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री मात्र पुढच्या रांगेत बसले होते.