या ठेक्यावर दारू नाही तर मिळते आणखी काही, आणि दररोज आल्यावर बदलते जीवन

खन्ना-मालेरकोटला या रस्त्यावर जरगड या गावात एक अनोखी गोष्ट...

Updated: Jul 31, 2019, 09:46 PM IST
या ठेक्यावर दारू नाही तर मिळते आणखी काही, आणि दररोज आल्यावर बदलते जीवन title=

लुधियाना : खन्ना-मालेरकोटला या रस्त्यावर जरगड या गावात एक अनोखी गोष्ट प्रवाशांना आकर्षित करत आहे. ते म्हणजे दर्शनदीप सिंग गिलच्या फॉर्म हाऊसवरील भिंतीवर 'ठेका' हा शब्द वाचल्यावर अनेकजण त्याठिकाणी थांबतात. चौकशी करतात आणि तेथून हसत हसत निघून जातात. मात्र, या ठेक्याचे औत्सुक दिवसागणित वाढतच आहे. अनेकजण हाच विचार करतात की इथे दारू मिळत असावी, मात्र याठिकाणी दारू मिळत नाही तर आणखी काही मिळते.

या प्रसिद्ध ठेक्यावर दारू मिळत नसून प्रादेशिक भाषेतील आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. ज्यांना वाचनाची गोडी आहे, त्या वाचकांना ही पुस्तके मोफत वाचायला मिळतात. दर्शनदीप सिंग यांनी समाजाचा विचार करून काही तरी वेगळे काहीतरी करण्याचे धाडस केले आहे. 

या ग्रंथालयाचे नाव 'ठेका' असे ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे 'ठेका' हा शब्द वाचून अनेकजण गोंधळात पडत आहेत. अनेक जण हा शब्द वाचला की आपली गाडी थांबवितात आणि चौकशी करतात. मात्र, त्यांना येथे दुसरेच काहीतरी मिळत असल्याचे समजल्यावर त्यांना हसू येते. 'ठेका' सुरु करणारे दर्शनदीप सिंग गिल हे पेशाने एक शिक्षक आहे. त्यांना समाजाला काहीतरी चांगले द्यायचे होते. त्यातून ही कल्पना सूचली. समाजात दारूच्या नशेपेक्षा जर पुस्तक वाचण्याचा छंद लागत असेल तर ते फार चांगले. ही बाब समाजासाठी चांगली असेल, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचले आहे. 

या ग्रंथालयात अनेक प्रकारची पुस्तके उपब्लध आहेत. येथे पुस्तके मोफत वाचायला मिळतात. इथे आरामात बसून कोणीही पुस्तक वाचू शकतो. या ग्रंथालयात विविधप्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. जसे देसी म्हणजे पंजाबी पुस्तके, इंग्रजी पुस्तके आणि इतर भाषामधील पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. 

 

फार्म हाऊसचे मालक दर्शनदीप सिंह गिल यांनी सांगितले की, वाचकांना जर पुस्तक वाचण्याचा कंटाळा आला तर याठिकाणी रंगवलेली भिंत आहे. त्यावर विविध प्रकारचे पक्षी रेखाटलेले आहेत. तसेच एक विहीरही आहे. तेही लोक पाहून आपला विरंगुळा करु शकतात. 

दुसऱ्या मजल्यावर फुल झाडे देखील लावली आहेत. जेणेकरून अशा वातावरणात वाचकाचे मन आनंदी राहील आणि त्याचे मन वाचनात लागेल. जर वाचकाला एखादे पुस्तक घरी न्यायचे असेल तर, तो वाचक घेऊन जाऊ शकतो. मात्र, घरी नेण्यात आलेले पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा ग्रंथालयाला जमा करावे लागते. अनेक लोक याचा या ग्रंथालयाचा लाभ घेत दर्शनदीप यांना धन्यवाद देत आहेत.