पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी सध्या आपल्या 'सूने'च्या शोधात आहेत. आपल्या तेज प्रताप आणि तेजस्वी यादव या दोन मुलांसाठी त्या विवाहयोग्य मुली पाहत आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्तानं रविवारी निवासस्थानावर झालेल्या कार्यक्रमात आपली 'भावी सून' कशी असावी, हे देखील राबडीदेवींनी स्पष्ट केलंय.
आपल्या मुलासाठी सिनेगृहांत आणि मॉलमध्ये जाणारी मुलगी अजिबात पसंत करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. केवळ 'संस्कारी' मुलगीच त्यांच्या घराची सून होऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट केलंय. आपला मुलगा तेजप्रताप धार्मिक आहे, त्यामुळे त्याला संस्कारी मुलगीच पत्नी म्हणून मिळायला हवी, असा त्यांचा आग्रह आहे. 'घर सांभाळणारी, मोठ्यांचा आदर करणारी... जशी मी आहे तशीच मुलगी हवी' असं त्यांनी म्हटलंय.
राबडी-लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रताप यादव एक मोटारसायकल शोरुमचा मालक आहे. सध्या तेजप्रताप बिहारचा आरोग्यमंत्रीपदी विराजमान आहे. तर, दुसरा मुलगा तेजस्वी यादव ज्यांचं प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेलं नाही सध्या बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी स्थानापन्न आहेत.
२००८ साली तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यावर दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागात मुलींची छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली - हरियाणा सीमाभागातील छत्तरपूरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा मुलींची छेडछाड केली... यावेळी मात्र मुलांच्या एका ग्रुपनं त्यांना चांगलीच अद्दल घडवण्यात आली होती. या दोघांनाही प्रथमोपचारासाठी जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्यावेळी या दोघांची नावं जाहीर केली नव्हती.
उल्लेखनीय म्हणजे, ज्या राबडीदेवींना मॉलमध्ये जाणाऱ्या मुली 'सून' म्हणून नकोत त्यांच्या कुटुंबानंच पाटणाच्याजवळ २ एकर जमीनीवर एक बिहारमधला आजवरचा सर्वात मोठ्ठा मॉल बांधायला घेतलाय. या मॉलमध्ये राबडीदेवी, त्यांची दोन मुलं आणि दोन मुली (चंदा आणि रागिनी) यांच्या नावावर ५० टक्के शेअर्स आहेत.