Narayana Murthy : भारतीय IT क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या इन्फोसिसच्या व्याप्तीत मोलाचा वाटा असणाऱ्या नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. सध्याच्या पिढीपुढे असणाऱ्या अनेक समस्या आणि आव्हानांवर कायमच वक्तव्य करणाऱ्या मूर्ती यांनी यावेळी एक अतिशय गंभीर इशारा देत सर्वांचं लक्ष वेधलं.
नारायण मूर्ती याच्या म्हणण्यानुसार येत्या काळात हवामान बदलांचा गांभीर्यानं विचार न केल्यास पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद इथं मोठ्या संख्येनं स्थलांतर होणार असून, ज्या भागांतून हे स्थलांतर होईल तो भाग कालांतरानं मानवी वास्तव्यासाठी योग्य अथवा मानवी वास्तव्यालायक राहणार नाही. बदलतं हवामान आणि तापमान हे दोन महत्त्वाचे घटक इथं कारणीभूत ठरणार आहेत.
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान नारायण मूर्ती यांनी या मुद्द्याकडे प्रकर्षानं लक्ष दिलं जाण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. 'भारतामध्ये विशेष म्हणजे आपण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांनी स्थानिक राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण होणार नाही याची काळजी घेणं अपेक्षित असून हे एक आव्हानच आहे', असं मूर्ती म्हणाले. यावेळी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्र, नेते आणि अधिकाऱ्यांवर असणारा आपला विश्वासही व्यक्त केला.
सदर समस्येवर आताच तोडगा निघेल असं नाही, पण या दशकाअखेर मात्र यावर नक्कीच पावलं उचलली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी हा सध्याच्या घडीला असणारा मोठा प्रश्न असून, त्यापासूनच कैक अडचणींना तोंड फुटत असल्याच्या वस्तूस्थितीकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं.
70 तासांचा कार्यालयीन आठवडा याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर नारायण मूर्ती यांनी आता पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर उजेड टाकला आहे. अर्थात यापूर्वी केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळं चांगलंच वादंग माजलं होतं. काही नोकरदारांनी त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. पण, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मात्र त्यांच्या या संकल्पनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. असं असलं तरीही दूरदृष्टी असणाऱ्या नारायण मूर्ती यांनी महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या स्थलांतराचा मुद्दा मांडल्यानं आता प्रशासनाचं लक्ष इथं वेधलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.