Student Died After Heart Attack: भारतात तरुण वयात येणाऱ्या हृदयविकारांच्या ( Heart Attack) आकड्यात वाढ होताना दिसत आहे. गेल्या जिम करताना, खेळत असताना तर अगदी खात असतानाही हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन लोकांनी प्राण गमावल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, आता अगदी शाळकरी मुलांनाही या आजाराने ग्रासले असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शाळेत प्रार्थना सुरू असतानाच ही घटना घडली आहे.
विद्यार्थ्याचे नाव सार्थक टिकरिया असं असून त्याचे वडिल अलोक टिकरिया मोठे उद्योजक आहेत. सार्थ महर्षी विद्या मंदिर स्कूलमध्ये 10वीच्या वर्गात शिकत होता. शाळेत पोहचल्यानंतर तो नेहमीसाठी प्रार्थनेसाठी उभा राहिला. मात्र त्याचवेळी तो खाली कोसळला. कोणाला काही कळायच्या आतच त्याची शुद्ध हरपली. शाळेतच्या कर्मचार्यांनी व शिक्षकांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
सार्थकच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता झोपेतून उठला होता. शाळेत जाण्यासाठी त्याने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं व तयार होऊन तो शाळेत गेला. साधारण 7.30 ते 8.00 च्या दरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थी मैदानात जमले होते. प्रार्थनेसाठी सगळे रांगेत उभे होते. मात्र प्रार्थना सुरू होताच तो खाली कोसळला.
शाळेतील कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला व तातडीने त्याच्या पालकांना याबाबत कळवलं. सार्थकला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सार्थक हा घरातील सर्वात धाकटा मुलगा होता. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
17 वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतर त्याचे कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलाच्या आठवणी जपण्यासाठी त्याच्या वडिलांनी मोठं पाऊल उचललं आहे. सार्थकच्या वडिलांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एका छोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचे डोळे दान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सार्थकला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. अनेकदा अनुवंशिक कारणामुळं किंवा हृदयपर्यंत रक्त प्रवाहाच्या मार्गात कॅमिकल संतुलन बिघडल्यामुळं अशा घटना घडतात. यामुळं हृदयाची गती अचानक वाढते आणि हृदयविकाराचा झटका येतो.