Kolkata Rape and Murder Case : कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणविरोधात संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. मृत डॉक्टरच्या शरीरावर तब्बल 25 जखमा असल्याचं समोर आलंय. यातील 16 जखमा ह्या बाहेरील बाजूस होत्या तर 9 गंभीर जखमा शरीराच्या आतील बाजूस असल्याच वैद्यकीय तपासातून समोर आलंय. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनही पुकारलं होतं. आरोपी संजय रॉयला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.
रिक्षा चालकाची विद्यार्थिनीला धमकी
कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. 'एका रिक्षा चालकाने रिक्षात बसलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनिंना धमकी दिली (Auto Driver Threatens Girl). तुमच्याबरोबर तेच करेन जे कोलकातामधल्या डॉक्टरबरोबर (Kolkata Rape and Murder Case) झालं आहे' रिक्षा चालकाने धमकी देताच रिक्षात बसलेल्या विद्यार्थिनी घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला. मुलींचा आरडाओरडा ऐकून रस्तावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांनी रिक्षा थांबवली आणि रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिक्षा चालकाने मागितली माफी
लोकांनी रिक्षा चालकाला पकडून त्याला बेदम चोप दिला. धमकी मिळालेल्या दोन विद्यार्थिनींनीही रिक्षा चालकाला बदडलं. याप्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीतला असल्याचं सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार दोन विद्यार्थिनी रिक्षात प्रवास करत होत्या, त्या आपापसात बोलत होत्या, यावर रिक्षा चालकाने त्यांना आवाज कमी करण्यास सांगितलं. यावरुन विद्यार्थिनी आणि रिक्षा चालकामध्ये वाद झाला.
वादाचं रुपांतर धमकीत
वाद वाढल्याने रिक्षा चालकाने विद्यार्थिनींना धमकी दिली. 'कोलकातामधल्या महिला डॉक्टरबरोबर जे झालं ते मी तुमच्याबरोबर करेन' अशी धमकी अशी यावेळी संतापलेल्या रिक्षा चालकाने दिली. ही धमकी ऐकून विद्यार्थिनी घाबरल्या. त्यांनी तात्काळ रिक्षा थांबवण्याची मागणी केली. रिक्षा थांबताच मुलींनी आरडाओरडा सुरु केला. यानंतर रस्त्यावरच्या लोकांनी मुलींच्या मदतीला धावत रिक्षा चालकाला पकडलं आणि त्याला चांगलंच बदडलं. रिक्षा चालकांनी माफी मागितल्यानंतर जमावाने त्याला सोडलं, पण त्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
"I will do the same to you as happened in Kolkata!" An auto driver threatened a girl.
Public caught him and serviced him properly before handing him over to police. pic.twitter.com/BfNvNakZj6
— Megh Updates (@MeghUpdates) August 23, 2024
मानसिकता कधी बदलणार?
ही विकृत मानसिकता कधी बदलणार हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोलकाता महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरण असो की बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार असो. या घटना संताप आणणाऱ्या आहेत. जो पर्यंत अशा प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होणार नाही, तोपर्यंत ही मानसिकता बदलणार नाही. रिक्षा चालकाची धमकी याच विकृत मानसिकतेचा एक भाग आहे.