भाजपच्या गडाला सुरूंग; २७ वर्षानंतर पहिल्यांदाच ढासळला बुरूज

थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमधून भाजपच्या गडाला सुरूंग लागला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकाठी हा भाजपला धोक्याचा इशारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 14, 2018, 11:18 PM IST
भाजपच्या गडाला सुरूंग; २७ वर्षानंतर पहिल्यांदाच ढासळला बुरूज title=

नवी दिल्ली : २०१८ मध्ये होणाऱ्या सर्वच पोटनिवडणुकांकडे या २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल म्हणून पाहिले जात आहे. या सेमिफायनलमध्ये उत्तर प्रदेशातून त्यातच थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमधून भाजपच्या गडाला सुरूंग लागला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकाठी हा भाजपला धोक्याचा इशारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात भाजपची जोरदार पिछेहाट झाली. काय आहेत या पराभवाची कारणे.... 

कार्यकर्त्यामध्ये असंतोष

गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार असंतोष होता असे बोलले जाते. या मतदारसंघात अधिकारी वर्गाची मनमानी चालत असल्याचीही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. नेत्यांनी लक्ष घातल्याशिवाय हे अधिकारी कोणतेच काम करत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना होती. या नाराजीमुळे पक्षाचा बुथ कमजोर राहिला.

उमेदवार निवडीत चुक

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, केंद्रीय नेतृत्वाने योगींचे म्हणने ऐकले नाही. योगींनी केंद्रीय नेतृत्वाला म्हटले होते की, गोरखपूर मध्ये केवळ पीठातील व्यक्तिच निवडणूक जिंकू शकतो. पण, नेतृत्वाने ते ऐकले नाही. त्यांनी उपेंद्र शुक्ला यांना तिकीट दिले. त्यातच शुक्ला हे प्रचारादरम्यान आजारी पडले. त्यामुळे त्यांचा संपर्क मतदारांशी होऊ शकला नाही.

भाजपला गटबाजीचा फटका

योगी सरकारवर ठाकुरवादाचा आरोप केला जात आहे. या कारणामुळेच उत्तर प्रदेशातील ब्राम्हण वर्ग मतदानासाठी बाहेर पडलाच नाही, असाही तर्क व्यक्त केला जात आहे. गोरखपूर परिसरात पहिल्यापासूनच ब्राम्हण समाजाचे बऱ्यापैकी वर्चस्व राहिले आहे. त्यातच हे हितसंबंध न जोपासणाऱ्या व्यक्तिला मैदानात उतरवल्यामुळे हा वर्ग नाराज होता.

जातीय समिरकरणात भाजप फसली

गोरखपूरमध्ये भाजपला घेरण्यासाठी समाजवादी पक्षाचे पहिल्यापासूनच जोरदार प्रयत्न होते. त्यामुळे सपाने थेट प्रतिस्पर्धी बसपलाच साद घातली आणि आघाडी केली. या आघाडीमुळे भाजपचे जातीय समिकरण विस्कटले.

बसपा -सप आघाडी

बसपा-सपा आघाडीने आखलेला जातीय समिकरणाचा मास्टर स्ट्रोक वर्मी बसल्याने भाजपचा किल्ला उन्मळून पडला.