Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध

Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.   

सायली पाटील | Updated: Apr 17, 2024, 08:54 AM IST
Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध  title=
indian railway vande bharat train helped government to earn rti activist ask question know latest update

Indian Railway : भारतीय रेल्वेनं आतापर्यंत कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुखकर केला आहे. अशा या रेल्वे विभागानं सातत्यानं काही नवनवीन संकल्पना राबवत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून प्रवाशांना नवनवीन अनुभव देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. याच प्रयत्नांपैकी एक म्हणजे वंदे भारत रेल्वे (Vande Bharat). भारतातली पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन अशी ओळख असणाऱ्या वंदे भारत ट्रेनची सुरुवात 15 फेब्रुवारी 2019 पासून झाली. दिल्ली आणि वाराणासीदरम्यान पहिली वंदे भारत धावली होती. 

आजच्या घडीला देशात तब्बल 102 वंदे भारत ट्रेन असून, 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह ही रेल्वे 284 जिल्ह्यांमधून साधारण 100 वेगवेगळ्या मार्गांवरून धावते. उपलब्ध आकडेवारीनुसार या रेल्वेनं आजमितीस 2 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून, 2023 ते 2024 या आर्थिक वर्षादरम्यान वंदे भारत ट्रेननं मारलेल्या फेऱ्या आणि पूर्ण केलेलं अंतर पाहता ते पृथ्वीच्या 310 फेऱ्या मारण्यासमान आहे. राहिला मुद्दा वंदे भारतचं भारत सरकारच्या तिजोरीत आणि रेल्वेच्या नफ्यात नेमकं किती योगदान देते यासंदर्भातला, तर त्याबबात महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. 

माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या वंदे भारतच्या उत्पन्नासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तर स्वरुपात ही माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत रेल्वेंच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वेगळा अहवाल उपलब्ध नसल्याचं इथं स्पष्ट करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या चंद्रशेखर गौड यांनी रेल्वे मंत्रालयानं मागील 2 वर्षांमध्ये वंदे भारत रेल्वेंच्या माध्यमातून किती रक्कम मिळवली, या रेल्वेगाड्यांमुळं नफा झाला की तोटा? यासंदर्भातील प्रश्न RTI अंतर्गत विचारला होता. ज्याचं उत्तर देत रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारतसंदर्भातील कोणताही राजस्व अहवाल नसल्याचं सांगितलं. 

कोणती माहिती उपलब्ध? 

रेल्वेच्या उत्पन्नासंदर्भातील किंवा नफ्याची आकडेवारी उपलब्ध नसल्याच्या उत्तरावर प्रश्नकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा आणि पूर्ण केलेलं अंतर यासंदर्भात माहिती मात्र उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळा

 

गौड यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत भारताची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन असल्या कारणानं रेल्वे विभागानं या रेल्वेतून मिळणाऱ्या आर्थिक लाभाची माहिती, नोंद ठेवणं महत्त्वाचं असल्याचा मुद्दा उचलून धरला. ही एक नव्या पिढीची रेल्वेगाडी असून, वरील आकडेवारी उपलब्ध झाल्यास रेल्वेच्या नफ्यासह लोकप्रियतेत आणखी भरच पडेल हा मुद्दाही अधेरेखित केला. दरम्यान, यापूर्वी माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीच उत्तरं देत असताना, वंदे भारतमधील जवळपास 92 टक्के आसनं आरक्षित होत असून, हा एक मोठा आणि समाधानकारक आकडा असल्याचंही सांगण्यात आल्यामुळं आता यातून मिळणारा नफा नेमका किती हेच जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचं कळत आहे. 

दरम्यान, अर्थविषयक सर्वेक्षण आणि अहवालांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार वंदे भारत आणि तत्सम नव्या रेल्वेंमुळं भारतीय रेल्वेच्या मिळकतीत साधारण 7 टक्क्यांनी भर पडते. मागील वर्षी एकट्या (Maharashtra) महाराष्ट्रात मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमुळं अवघ्या 25 दिवसांत 10.72 कोटी रुपयांची कमाई करून दिल्याची माहिती समोर आली होती. तेव्हा आता वर्षभराच्या कमाईची आकडेवारी किती असेल याचा अंदाज तुम्ही लावूच शकता. दरम्यान, संपूर्ण देशभरातील वंदे भारतच्या कमाईचा एकूण आकडा किती या प्रश्नाचं अधिकृत उत्तर मात्र अद्यापही प्रतीक्षेतच आहे.