अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : बेबी डॉल अभिनेत्री सनी लिओनीनं मुलगी दत्तक घेतल्यानंतर अजूनही सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे. सध्या दत्तक मुली घेण्याचं प्रमाण वाढलंय... मुलगा किंवा मुलगी यापैकी पसंती मुलींना दिली जातेय, असं दिसतंय.
'सिंगल पेरेंट' ही संकल्पना भारतात फारशी प्रचलित नव्हती त्यावेळी 'मिस युनिव्हर्स' सुश्मिता सेननं अनाथ मुलीला दत्तक घेतलं... आता २०१७ मध्ये सनी लिओनीनंही एका मुलीला दत्तक घेतलंय... सेलिब्रिटींनी मुलं दत्तक घेतली की त्याची चर्चा होते. गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य कुटुंबांमध्येही मुलं दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलंय. त्यातही मुली दत्तक घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात मुली करत असलेली प्रगती, त्यामुळे त्यांना मिळणारा आदर, मुलींची हौस अशा अनेक कारणांमुळे दत्तक घेण्यासाठी मुलींना पसंती मिळतेय.
मुलगी दत्तक घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी दत्तक घेण्यासाठी नियम हे सारखेच आहेत. 'कारा' अर्थात 'सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स ऑथोरिटी' ही सरकारी संस्था यावर नियंत्रण ठेवते.
- लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर मूल दत्तक घेता येतं
- मूल दत्तक घेण्यासाठी 'कारा'च्या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे
- मूल दत्तक देताना अनाथालय संबधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, वैवाहिक सामंजस्य या सगळ्या बाबी पडताळून पाहिलं जातं
- याला 'होम स्टडी' असं म्हटलं जातं. संबंधित जोडप्याच्या घरी जाऊन हा अभ्यास केला जातो
- पॅन कार्ड, आधार कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते
या शिवाय मूल दत्तक घेण्याआधी आणि मूल दत्तक घेतल्यानंतर काऊन्सिलिंगही केलं जातं. एका दाम्पत्याला तीन वेळा मूल दत्तक घेण्याची परवानगी कारानं दिलीयं... त्यामध्येही दोन मुली दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या जास्त आहे.