शेतकऱ्याची थट्टा! 4 लाखांच्या कर्जावर फक्त 515 रुपयांची सवलत; CM च्या मध्यस्थीला एवढीच किंमत?

Farmer Loan Appeal To CM: मुख्यमंत्र्यांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याने त्यांच्याकडे या कर्जाबद्दलचा अर्ज केला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी याचसंदर्भात एक पत्र मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 27, 2023, 12:38 PM IST
शेतकऱ्याची थट्टा! 4 लाखांच्या कर्जावर फक्त 515 रुपयांची सवलत; CM च्या मध्यस्थीला एवढीच किंमत? title=
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर दिली मदत (फाइल फोटो, सौजन्य - पीटीआय)

Farmer Loan Appeal To CM: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांकडून अर्ज आणि विनंत्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या अशाच एका अर्जानंतर एका शेतकऱ्याला केवळ 515 रुपयांची सवलत मिळाली आहे. कन्नूर जिल्ह्यातील इरिट्टीमधील शेतकऱ्याने नोव्हेंबर महिन्यात विजयन सरकारच्या अधिकाऱ्यांच्या टीमकडे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कर्जामध्ये सवलत देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र कर्जाची रक्कम आणि दिलेली सवलत पाहता ही मदत आहे की यंत्रणेनं या गरजू शेतकऱ्याची खिल्ली उडवली आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडे अर्ज

आपल्या घराच्या डागडुजीसाठी या शेतकऱ्याने 4 लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र नंतर हे कर्ज फेडणं त्याला जमलं नाही. त्यामुळेच या कर्जामध्ये सवलत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली. मुख्यमंत्री विजयन यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान कासरगोडवरुन पुढे रवाना होताना, "सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या आणि अर्जांचा विचार केला जाईल. 2 आठवड्यांमध्ये या अर्जांची चाचपणी होईल आणि पुढील 45 दिवसांमध्ये या अर्जांमधील समस्यांवर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला जाईल," असं स्पष्ट होतं.

बँकेचं पत्र पाहून बसला धक्का

कर्ज माफ करण्यासाठी केलेल्या अर्जानंतर आपल्याला सवलत मिळेल अशी अपेक्षा ठेऊन वाट पाहणाऱ्या या शेतकऱ्याला काही दिवसांपूर्वीच बँकेचं एक पत्र आलं. केरळ बँकेने पाठवलेल्या या पत्रामधील मजकूर पाहून धक्काच बसला. तुम्हाला 515 रुपयांची सवलत दिली जात आहे, असं शेतकऱ्याला सांगण्यात आलं. उर्वरित 3 लाख 97 हजार 216 रुपयांची रक्कम तुम्ही देयक शिल्लक राहिलेल्या खात्यात जमा करावी, असं बँकेने सांगितलं. 

लक्झरी बसने केला दौरा

केरळचे काँग्रेस उपाध्यक्ष वी. टी. बलराम यांनी यावरुन सरकावर टीका केली आहे. गरीब शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना अर्ज देण्यासाठी आपल्या एका दिवसाच्या मजुरीवर पाणी सोडलं. त्या एका दिवसात त्याला हजार रुपये मिळाले असते. पण सरकारने त्याला 515 रुपयांची सवलत देऊन त्याची थट्टा केली आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री विजयन यांच्या राज्यव्यापी दौऱ्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांबरोबर कासरगोडमधून सुरु केलेली ही यात्रा शनिवारी संपुष्टात आली. 140 विधानसभा क्षेत्रामध्ये लक्झरी बसने मुख्यमंत्री आणि मंत्री फिरले. 

दौरा यशस्वी असल्याचा दावा

'नव केरळ यात्रा' नावाने विजयन आणि सत्तारुढ डाव्या दलाच्या नेत्यांनी हा दौरा फार यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. तर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाची ही शेवटची यात्रा होती असा दावा केला आहे. मात्र मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील म्हणजेच कन्नूरमधील शेतकऱ्याबरोबर घडलेला हा प्रकार राज्यभरात चर्चेत आहे.