एकही पुरावा नसताना पोलिसांनी AI च्या सहाय्याने केला हत्येचा उलगडा; आरोपीही पोलिसांना पाहून हादरले

दिल्ली पोलिसांना 10 जानेवारीला गीता कॉलनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता.   

शिवराज यादव | Updated: Jan 25, 2024, 12:37 PM IST
एकही पुरावा नसताना पोलिसांनी AI च्या सहाय्याने केला हत्येचा उलगडा; आरोपीही पोलिसांना पाहून हादरले title=

दिल्ली पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटेलनिजन्सच्या (AI) आधारे एका हत्येचा उलगडा केला आहे. पोलिसांनी AI तंत्रज्ञानाच्या आधारे फक्त आरोपीची ओळखच पटवली नाही, तर मुख्य आरोपीलाही बेड्या ठोकल्या. पोलिसांना 10 जानेवारीला पूर्व दिल्लीत गीता कॉलनी फ्लायओव्हच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी शवविच्छेदन केलं असता गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचं उघड झालं. पण पोलिसांना मृतदेहावर किंवा जवळ ओळखीचा कोणताच पुरावा न सापडल्याने मोठं आव्हान उभं राहिलं होतं. 

यानंतर दिल्ली पोलिसांनी सध्या चर्चेत असणाऱ्या AI तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला असल्याने पारंपारिक पद्धतीने त्याची ओळख पटवणं अशक्य होतं. यामुळे पोलिसांनी AI च्या सहाय्याने मृतदेहाचा चेहरा पुन्हा एकदा व्यवस्थित केला. अशाप्रकारे पोलिसांनी त्याला डिजिटल पद्धतीने जिवंत केलं. 

पोलिसांनी यानंतर मृत व्यक्तीचे 500 पोस्टर्स छापले आणि राजधानीतील वेगवेगळ्या ठिकाणी चिकटवले. याशिवाय त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरही हा फोटो शेअर करत ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु केला. पीडित तरुणाच्या फोटोच्या मागील चित्रंही बदलण्यात आलं. 

पोलीस स्थानकाबाहेरही तरुणाच्या फोटोचं पोस्टर चिकटवण्यात आलं होतं. अखेर त्या फोटोमुळेच पोलिसांना पहिलं यश मिळालं. एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि हा आपला मोठा भाऊ हितेंद्र असल्याचं सांगितलं. यानंतर पोलीस तपासाला वेग आला. पोलिसांनी चौकशी केल्यावर हितेंद्रचा तीन जणांशी वाद झाला होता, त्यातून हाणामारी झाली अशी माहिती मिळाली. 

तिन्ही आरोपींनी हितेंद्रची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर त्यांनी पुरावे लपवण्यासाठी एका महिलेची मदत घेतली होती. पोलिसांनी माहिती मिळताच महिलेसह एकूण चौघांना अटक केली आहे.