नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2022) विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न नितीश कुमार सध्या करत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्ली येथे भेट घेतली. माध्यमांसोबत बोलताना पंतप्रधानपदाबाबत देखील त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारमध्ये आरजेडी सोबत सरकार स्थापन केलंय. नितीश कुमार आता विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Bihar CM Nitish Kumar meet NCP chief Sharad Pawar)
नितीश कुमार म्हणाले की, 'आम्ही जेव्हा भाजपपासून वेगळे झालो तेव्हा शरद पवारांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि बोलले की तुम्ही चांगलं काम केलं. यासाठी मी त्यांना भेटायला आलोय. शरद पवार आणि माझं एकच मत आहे की राज्याच्या विकासासाठी सगळ्यांनी आप आपल्या राज्यात योग्य काम करावे. विकास कामे करावे.'
'शरद पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. जास्तीत जास्त लोकं विरोधी गटात येत आहेत. भाजपच्या विरोधात जेव्हा एकता होईल तेव्हा सगळे विचार विनिमय करतील. एकत्र जर लढले तर देशाच्या विकासाचं काम होईल. हे लोक तर काही काम करत नाही आहेत. देशावर फक्त कब्जा मिळवण्याच काम करत आहेत. त्यासाठी विरोधकांनी एकत्र होणे गरजेचे आहे.'
'आमची काँग्रेस सोबत बोलणी सुरू आहे. पुढे पण आणखी काही पक्षाशी बोलणी होणार आहे. खूप चांगला प्रतिसाद भाजप विरोधात आहे. सोनिया गांधी आल्यानंतर पुन्हा त्यांना भेटायला येणार आहे. पण मी पंतप्रधान बनणार नाही.' असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.