पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 13 दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या उदयपूर - अहमदाबाद रेल्वे मार्गावर (Udaipur Ahmedabad railway) शनिवारी रात्री स्फोट (Blast) घडवून आणण्यात आल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिकदृष्ट्या रेल्वे रुळ (railway trak) उडवण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे वाटत आहे. रेल्वे रुळाशेजारी दारुगोळाही सापडला आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला खाणकामही सुरु आहे. पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून घटनास्थळाच्या दोन्ही बाजूंनी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. (Blast on Udaipur Ahmedabad railway track PM modi had inaugurated on 31 october)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 दिवसांपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले होते. ही घटना शनिवारी रात्री उशिरा साळुंबर मार्गावरील केवडे की नाल येथे घडली. रात्री दहाच्या सुमारास ग्रामस्थांना मोठा आवाज ऐकू आला यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता दारु गोळाही आढळून आला. स्फोटाच्या 4 तास आधी ट्रेन रुळावरून गेली होती. या घटनेनंतर अहमदाबादहून उदयपूरला येणारी ट्रेन डुंगरपूरमध्येच थांबवण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी पाहिले असता अनेक ठिकाणी लोखंडी रुळही तुटलेले होते. पुलावरील लाइनमधून नट आणि बोल्टही गायब असल्याचे आढळून आले. रुळावर एक पातळ लोखंडी पत्राही उखडलेला आढळून आला. अद्याप या घटनेबाबत कोणाताही खुलासा करण्यात आलेला नाही. ग्रामस्थांच्या माहितीवरून रविवारी सकाळी अधिकारी व पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी ही घटना चोरट्यांनी घडवून आणल्याचे सांगितले. या प्रकरणामागे काही मोठे षडयंत्र असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
16 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर उदयपूर-अहमदाबाद ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी असरवा स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, उदयपूरचे खासदार अर्जुनलाल मीना, चित्तोडगडचे खासदार सीपी जोशी आणि बांसवाड्याचे खासदार कनकमल कटारा हे देखील उपस्थित होते.