Bihar Crime : बिहारमधील (Bihar News) मुझफ्फरपूरमधील अहियापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातून तीन जणांची हत्या करणाऱ्या एका सायको किलरला (serial killer) अटक केली आहे. पोलिसांनी (Bihar Police) सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला अमली पदार्थांचे व्यसन असून तो स्मॅक विकत घेण्यासाठी खून करत असे. आरोपी मृतांचे मोबाईल आणि इतर वस्तू विकायचा. शिवचंद पासवान उर्फ भोलवा असे या आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे. आरोपीने सलग तीन खून करुन सर्वांनाच हादरवून सोडलं होतं.
पोलिसांसमोर कबुल केला गुन्हा
शिवचंद्र पासवान याला पोलिसांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की, अहियापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची एकाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. तर आणखी एका सुरक्षा रक्षकावर आरोपीने अटक केला होता. मारेकरी अमली पदार्थासाठी या सगळ्या हत्या करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बऱ्याच तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. चौकशीत आरोपीने सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यासोबतच पोलिसांनी आरोपीच्या घरातून हत्येसाठी वापरलेले दोन बार, लाकडी बॅट आणि एका मयताचा मोबाईल जप्त केला आहे.
आरोपी शिवचंद्र पासवान याने 30 एप्रिल, 2 आणि 8 मे रोजी सुरक्षा रक्षकांच्या हत्या केल्या होत्या. या सर्व प्रकरणात पोलिसांनी एक गोष्ट लक्षात आली की हल्लेखोराने सर्वांच्या खिशातून पैसे काढले आणि सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले. फोन नंबरच्या तांत्रिक तपासातून कोल्हुआ-पैगंबरपूर परिसरात सर्व मोबाईल बंद झाल्याचे पोलिसांना समजले.
मात्र यापुढे तपास जात नव्हता. वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी एसआयटीची स्थापन केली होती. सीरियल किलरकडील मोबाईल फोन चालू होण्याची पोलीस वाट पोहत होते. त्यानंतर शेवटच्या खुनाच्या दोन आठवड्यांनंतर मोबाईल फोन सुरु झाला. पोलिसांचे पथक तात्काळ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. मात्र त्याने हा मोबाईल फोन एका महिला चहा विक्रेत्याकडून विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी चहा विक्रेत्याकडे चौकशी केली असता तिला तिने शिवचंद्र पासवान नावाच्या व्यक्तीकडून दोन मोबाईल फोन घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी शिवचंद्रचा शोध घेतला. पोलिसांच्या चौकशीत त्याने तिन्ही हत्यांची कबुली दिली. शिवचंद्र पासवानने पोलिसांना सांगितले की, तो दिवसा रेकी करायचा आणि रात्री 3 ते पहाटे 5 या वेळेत खून करायचा.