'या' राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स-टीशर्ट परिधान करण्यास बंदी

अपवादात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना या नियमातून सूट मिळेल. 

Updated: Aug 30, 2019, 02:27 PM IST
'या' राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स-टीशर्ट परिधान करण्यास बंदी

पाटणा: बिहारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना टीशर्ट आणि जीन्स पँट परिधान करण्यास बंदी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून हे आदेश जारी केले. सरकारी कार्यालयातील कर्मचारी हे टीशर्ट आणि जीन्स घालून भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध वर्तन करत आहेत. ही कृती सरकारी कार्यालयाच्या प्रतिष्ठेचा भंग करणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. 

त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साधे कपडे (फॉर्मल) परिधान करून येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांच्या दिवशी आणि अपवादात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना या नियमातून सूट मिळेल. 

काही दिवसांपूर्वी कर्मचारी भडक कपडे घालून कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर अपर सचिव शिव महादेव प्रसाद यांनी हे आदेश दिले. मात्र, ड वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम लागू असतील.

मात्र, या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार की नाही, याबाबत साशंकताच आहे. कारण, हा आदेश लागू झाल्यानंतरही अनेक कर्मचारी कार्यालयात सर्रास जीन्स आणि टीशर्ट घालून येताना दिसले.