नवी दिल्ली : Covid-19 cases in India : कोरोनासंदर्भात एक महत्त्वाची बातमी. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. तर मुंबईत नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. यात 2 लहान मुलींचाही समावेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना सावध केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील करोना संसर्गाची स्थिती आणि लसीकरणाचा त्यांनी आढावा घेतला. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाबाबत आखलेले नियम, चाचणी आणि लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करायची सूचना त्यांनी राज्यांना केली.
मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडलेत. बी.ए. 5 चे तीन आणि बी ए.5 व्हेरीयंटचा एक रुग्ण सापडला आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत कोरोनाचे स्वॅब तपासल्यानंतर नव्या व्हेरियंटचे रुग्ण असल्याचं समोर आले. अकरा वर्षांच्या दोन मुलींना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. तर 40 आणि 60 वर्षांचे दोन पुरुष आहेत. हे चौघेही होम आयसोलेशनमध्ये आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना कोरोना झाला होता. त्यांच्या नव्या व्हेरियंटचा रिपोर्ट आता आला आहे.