काय आहे रॅबिट फीवर? जाणून घ्या लक्षणे आणि त्यावरील उपाय

रॅबिट फीवर हा एक संसर्गजन्य आजार आहे. अमेरिकेत या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराची किरकोळ लक्षणे जाणवल्यानंतर लगेच उपचारपद्धतींचा अवलंब केल्याने आजार लवकर बरा होण्यास आणि गंभीर परिणामांपासून वाचण्यास मदत होते. 

Updated: Jan 6, 2025, 04:01 PM IST
काय आहे रॅबिट फीवर? जाणून घ्या लक्षणे आणि त्यावरील उपाय title=

Rabbit Fever: रॅबिट फीवर हा एक दुर्मिळ आजार आहे. याला तुलारेमिया असं सुद्धा म्हणतात. मागील काही वर्षांपासून अमेरिकेत या आजारामुळे रुग्णांची वाढ पाहायला मिळत आहे. या आजारामुळे ग्रासलेल्या रुग्णांची वाढ आता चिंतेचा विषय ठरला आहे. अमेरिकी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (CDC) च्या नुसार 2011 ते 2022 दरम्यान तुलारेमियाच्या आजारात जवळपास 56 टक्के वाढ झाली आहे. 

खास करुन पाच ते नऊ वर्षांची मुले, वरिष्ठ नागरिक आणि अमेरिकी भारतीय किंवा अलास्काचे मूळ निवासी हे तुलारेमिया आजाराचे शिकार ठरतात. यासोबतच, जंगलात जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. हा एक गंभीर आजार असून या आजाराविषयी योग्य ती माहिती जाणून घेतल्याने या आजारापासून दूर राहण्यास मदत होईल. 

रॅबिट फीवर (तुलारेमिया)ची लक्षणे

सामान्यत: इंफेक्शन झाल्यानंतर तीन ते पाच दिवसांमध्ये या आजाराची लक्षणे दिसू लागतात. तुलारेमिया या आजारात 104 डिग्री F पर्यंतचा ताप, अंगदुखी, थकवा आणि सर्दी अशी लक्षणे दिसू शकतात. हा एक संसर्गजन्य रोग असून या आजारात शरीरात संसर्गाच्या ठिकाणी असलेल्या लिम्फ नोड्सना सूज येते. अल्सेरोग्लँड्यूलर, ओक्युलोग्लँड्यूलर, न्यूमोनिक आणि टायफॉइडल हे रॅबिट फीवरचे चार प्रकार आहेत. 

हे ही वाचा:  कोणतीही भाजी बनवताना 'या' 5 चुका टाळा; अन्यथा शरीराला होईल शून्य फायदा

तुलारेमिया कसा पसरतो?

तुलारेमिया हा आजार फ्रांसिसेला तुलारेन्सिस या बॅक्टेरियाच्या संक्रमणाद्वारे होतो. संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने हा आजार होतो. सामान्यत: संक्रमित ससा तसेच हरणांच्या माध्यमातून फ्रांसिसेला तुलारेन्सिस या बॅक्टेरियाचे संक्रमण होते. याव्यतिरिक्त, गोचीडचे चावणे, संक्रमित प्राण्यांचे मांस खाणे तसेच दूषित पाणी या गंभीर आजाराला कारणीभूत ठरतात. 
 

का होत आहे 'रॅबिट फीवर' या आजारात वाढ

  • उष्णतेमुळे गोचीडींच्या संख्येत वाढ होते आणि त्यांचा प्रजनन काळ सुद्धा वाढतो. गोचीडींच्या वाढत्या संख्येमुळे हा रोगाचा प्रसार होतो.
  • जंगलतोड आणि जैविक परिसरात राहिल्याने संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात वाढ होते. अशा प्राण्यांच्या संपर्कात आल्याने तुलारेमियाचा धोका वाढतो. 
  • प्रदुषणामुळे दूषित पाणी आणि दुषित खाद्यपदार्थांचे वाढते प्रमाण या आजाराचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरतात. 

तुलारेमिया आजारावरील उपाय

तुलारेमिया या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी अँटीबायोटीक्सचा वापर केला जातो. डॉ. रेड्डी यांच्या मते, उपचाराच्या दृष्टीने स्ट्रेप्टोमायसिन आणि जेंटोमायसिन उत्तम पर्याय मानले जातात. तसेच या आजाराच्या किरकोळ लक्षणांसाठी डॉक्सिसायक्लिन किंवा सिप्रोफ्लोक्सासिन यांचा वापर केला जातो. आजारांची लक्षणे कळल्यानंतर 10 ते 21 दिवसांत उपचार केले जाऊ शकतात. किरकोळ लक्षणे जाणवल्यानंतर लगेच उपचारपद्धतींचा अवलंब केल्याने आजार लवकर बरा होण्यास आणि गंभीर परिणामांपासून वाचण्यास मदत होते. 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)