मुंबई : कोरोनाची प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. खबरदारीचा इशारा म्हणून देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान आजपासून देशात 12 ते 14 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी बालकांच्या लसीकरणाबाबत सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटल्याप्रमाणे, 16 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटातील मुलांचं कोविड-19 लसीकरण सुरू झालं आहे. 12-13 आणि 13-14 वयोगटातील मुलांसाठी फक्त 'कॉर्बेवॅक्स वॅक्सीन' वापरली जाईल.
तज्ज्ञांशी केल्यानंतर केंद्र सरकारने 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) ने 12-14 वयोगटातील मुलांचं लसीकरण लवकरात लवकर सुरु व्हावं यासाठी शिफारस केली होती.
केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, लसीकरणासाठी मुलांचं वय किमान 12 वर्षे असणं गरजेचं आहे. ज्या मुलांना लसीकरण करायचं आहे, त्यांची जन्मतारीख 16 मार्च 2010 नंतरची नसावी. मिळालेल्या माहितीनुसार, देशात 12 ते 14 वयोगटातील 7.11 कोटी मुलं आहेत.
लसीकरणापूर्वी मुलांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. या मुलांचंही कोविन पोर्टल www.cowin gov.in किंवा आरोग्य सेतूवर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.
या वयोगटातील मुलांना बायोलॉजिकल ई. कंपनीची 'कॉर्बेवॅक्स वॅक्सीन' देण्यात येणार आहे. पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी 28 दिवसांचं अंतर असेल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस 90 टक्के प्रभावी असल्याची माहिती आहे.